मुंबई महापालिकेच्या आधी ठाकरेंची सगळी भांडी फोडणार! खासदार नारायण राणेंचा इशारा
27-May-2025
Total Views | 32
मुंबई : उद्धव ठाकरे आता तुम्ही आवळत चालले आहात. मुंबई महापालिकेच्या आधी तुमची सगळी भांडी फोडणार आहे, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी मोदी, अमित शाह आणि भाजप हे शब्द उच्चारू नये. आता तुम्ही आवळत चालले आहात. आता २० आमदार आहेत, पुढच्या वेळीच ५ व्यक्ती राहतील. मुंबई महापालिकेच्या आधी तुमची सगळी भांडी फोडणार आहे. कारण माझ्याएवढे दुसरे कुणीही साक्षीदार असू शकत नाही.
"मुंबईत पहिल्यांदा इतका पाऊस झाला नाही. मागच्या वर्षीदेखील जोरदार पाऊस पडला होता. मुंबईतील अनेक भागांत पाऊस पडल्यानंतर लगेच पाणी समुद्राला जाऊन मिळते. मुंबईचा भौगोलिक नकाशा पाहिल्यास मुंबईत समुद्राची उंची जास्त आणि मुंबईची जमीन खाली असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यासाठी अनेक उपाययोजना सुरु आहेत. २६ वर्षे तुमची सत्ता असताना पाण्याचा निचरा होण्यासाठी तुम्ही का उपाययोजना केल्या नाहीत? २००५ मध्येही मुंबईत ९४४ मिलीमीटर पाऊस पडला होता. यापेक्षाही भयानक परिस्थिती होती. त्यावेळी महापालिका उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता. लोकांच्या घराघरात पाणी शिरलं होतं. अनेक लोक मृत पावली होती. पण उद्धव ठाकरे हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करत होते. आता लोकांना मदत करण्याऐवजी ते सरकारवर टीका करतात. एकनाथ शिंदेंवर टीका करतात. टीका करण्यापेक्षा नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वांनीच माणूसकी धर्म म्हणून मदत केली पाहिजे," असेही नारायण राणे म्हणाले.
ठाकरेंच्या राशीत मदत शब्द आहे का?
"पावसाची ही सुरुवात आहे. अजून जुलै, ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे. पण ठाकरे सरकारला आणि लोकांना मदत करायची सोडून एकनाथ शिंदेंना नावं ठेवतात. आदित्य ठाकरेंना धड मराठी बोलता येत नाही आणि ते दुसऱ्यांची नक्कल करतात. आम्ही उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल? आधी तुमचे चेहरे आरशात नीट बघा आणि नंतर दुसऱ्यांची नक्कल करा. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत पावसात घरे बुडालेल्या किती लोकांची मदत केली? तुमच्या राशीत मदत हा शब्द आहे का?" असा सवालही त्यांनी केला.
राऊतांच्या नादी लागू नका!
"आदित्य ठाकरे तुम्ही संजय राऊतांच्या नादी लागू नका. संजय राऊत महात्मा झालेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेत आणि पुस्तक काढले. जसे काही ते देशासाठी फार मोठ्या संग्रामात जाऊन आलेत आणि त्यांनी पुस्तक काढले. त्यांचे काय कौतूक झाले? साडे दहा वर्षात मोदी सरकारने काय काय केले हे संजय राऊतांना दिसत नाही का? जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चौथ्या क्रमांकावर आला हे तुम्हाला काही कळतं का? लवकरच आपण जागतिक पातळीवर जर्मनीच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर जाऊ," असेही ते म्हणाले.
"भ्रष्टाराचाबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. १९८५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना मी बेस्टचा चेअरमन होतो. भ्रष्टाचार कोण करायला सांगत होते?, त्याचा पैसा कुणाच्या घरात जायचा? हे सगळे मला माहिती आहे. उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचाराच्या वर उभे आहात. अडीच वर्षांच्या सरकारमध्ये कोरोनाकाळात औषध खरेदीमध्ये आदित्य ठाकरेंनी भ्रष्टाचार केला. त्याची चौकशी सुरु आहे. ठाकरेंचे उत्पन्न काढा आणि त्यांनी भ्रष्टाचार केला की, नाही ते सांगा. माझ्याकडे त्यांची परदेशातील गुंतवणूकीची माहिती आली आहे. त्यांनी लंडनमध्ये गुंतवणूक केली. कुठल्या कंपनीचा नफा तिकडे पाठवला? कोरोना काळात सगळे वृत्तपत्र तोट्यात होते. फक्त सामना वृत्तपत्र नफ्यात होते. हे कसे त्याबद्दल त्यांना विचारायला हवे," असेही नारायण राणे म्हणाले.
दिनो मोरियाचे घर भ्रष्टाचाराचा अड्डा!
ते पुढे म्हणाले की, "दिनो मोरिया आदित्य ठाकरेंचा मित्र आहे. त्याचे घर त्यांचे उठण्या बसण्याचे ठिकाण आहे. तो भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. दिशा सालियानच्या मृत्यूचा प्लॅन दिनो मोरियाच्या घरून झाला. तोसुद्धा दिशाच्या केसमध्ये आत जाणार आहे. पक्षपात न करता सगळ्या केसेस ओपन होतील तेव्हा आदित्य ठाकरे कुठल्या धंद्यात आहेत ते उघड होईल. दिनो मोरियाला सगळे कंत्राट दिले. तो आज उद्या तुरुंगात जाईलच. मी सगळी कंत्राटे काढणार आहे. माझ्याकडे तीन वर्षांची माहिती आहे. आदित्य ठाकरे संध्याकाळी तीन तीन तास दिनो मोरियाकडे बसतात. तिथे काय चालते? तिथे कोण कोण येतात? याबद्दलची सगळी माहिती माझ्याकडे आहे. पण मी फार गप्प आहे. उगाच आमच्या नेत्यांची नावं घेऊ नका तुम्हाला ते परवडणार नाही," असा इशाराही खासदार नारायण राणेंनी दिला आहे.