भारत-बांगलादेश सीमासुरक्षा आणि उपाययोजना

    08-Feb-2025
Total Views | 30

भारत-बांगलादेश
एका आकडेवारीनुसार, तब्बल पाच ते सहा कोटी बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे. त्यामुळे भारत-बांगलादेशच्या सीमासुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने सीमेसुरक्षेतील आव्हाने आणि उपाययोजना यांचा केलेला हा उहापोह...
भारत-बांगलादेश सीमा सुरक्षेची जबाबदारी अर्ध सैनिक दल असलेल्या ‘बीएसएफ’कडे आहे. प्रत्येक बटालियन दहा ते 12 ‘बीओपी’ सीमेवर तैनात करते. अशा सीमेवर 714 ‘बीओपीज’ आहेत. प्रत्येक ‘बीओपी’मधील अंतर साडे तीन ते साडे सहा किमी इतके असते. ‘बीओपी’मधील भागावर ‘ऑब्झर्व्हेशन पोस्ट’ किंवा ‘पेट्रोलिंग(गस्त) करून लक्ष ठेवले जाते. सीमासुरक्षेकरिता
 
 
सीमेवर तैनात ‘बीएसएफ’कडे अत्यंत मर्यादित अधिकार आहेत. ‘बीएसएफ’ने पकडलेल्या स्मगलर्स, तस्करांना, अपराध्यांना, घुसखोरांना राज्य पोलिसांकडे द्यावे लागते आणि मतपेटीच्या राजकारणामुळे राज्य पोलीस अशा पकडल्या गेलेल्या घुसखोरांना काही काळातच सोडतात. स्वतः ‘बीएसएफ’ त्यांच्याविरुद्ध खटला चालवू शकत नाही.
 
सीमेवर तस्करी ही मोठ्या प्रमाणावर सुरू असते. या तस्करीमध्ये पशूंची तस्करी, खोट्या नोटा, भारतीय नाणी, हत्यारे, दारुगोळा, मादक पदार्थ यांसह इतर अनेक दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या वस्तूंची तस्करीही चालू असते. याखेरीज कोळसा, लाकूड, सरकारी धान्य, केरोसीन यांचीही तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असते.
 
सीमेची सच्छिद्रता (र्झेीेीी इेीवशी)जिथे गस्त घालणे अवघड असते, अशा नदीतीरांवरील आणि जंगलातील क्षेत्रे तर या समस्येत भर घालतात. निवडणुकांकरिता आणि इतरही कारणास्तव सीमा सुरक्षा दले इथून काढून घेतल्यास घुसखोरी सोपी होते.
 
सीमाभागातील लोकांची निष्क्रिय प्रवृत्ती
 
काही सीमावर्ती भागांतील लोकसंख्येची घनतादर वर्ग किलोमीटरला सुमारे 700-800 व्यक्ती इतकी असते, तर त्याच ठिकाणच्या बांगलादेशकडील बाजूची लोकसंख्या-घनतादर वर्ग किलोमीटरला सुमारे एक हजार व्यक्ती इतकी असते. लोकसंख्येची एवढी अतिघनता आणि सच्छिद्र सीमा शोधकार्यात आणि गुन्हेगारांना पकडण्यात अडचणी उपस्थित करतात. कारण, अटक टाळण्याकरिता दुसर्‍या बाजूस पळून जाण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध असतो. काही गावे तर सीमेच्या इतकी जवळ वसलेली आहेत की, घुसखोरीमुळे तिथल्या लोकसंख्येची घनता, देशातील लोकसंख्या घनतेच्या मानाने खूप जास्त झालेली आहे. दक्षिण बंगालमधील सुमारे 187 गावे तर सीमेपासून अवघी 150 यार्डच्या आतच वसलेली आहेत.
 
बांगलादेशी नागरिकांना परत मूळदेशी घालवून देणे
 
पकडण्यात आलेले बांगलादेशी नागरिक, बांगलादेशात परत पाठवावे लागतात. अनेकदा ‘बांगलादेश रायफल्स’कडून त्यांच्याबाबत काहीच प्रतिसाद मिळत नाही. पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांना मग ठेवून घ्यावे लागते आणि पोसतही राहावे लागते. यामुळे गंभीर स्वरूपाच्या प्रशासकीय समस्या निर्माण होत असतात.
 
कुंपणाच्या मानवविहीन, अनारक्षित फटी
 
भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यामागचे प्राथमिक उद्दिष्ट गुन्हेगारांचा ओघ थांबवण्याचा, तस्करी रोखण्याचा आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षितता पुरविण्याचा होता. मात्र, कुंपण पूर्ण झाले नसल्याने त्यात रुंद फटी अस्तित्वात आहेत. भूसंपादनातील संथ प्रगती, स्थानिकांचा विरोध, प्रकल्प संकल्पनेतील त्रुटी आणि गांभीर्याचा अभाव यामुळे असे घडते. 24 तास गस्त आणि लक्ष असेल, तरच ते प्रभावी ठरू शकते. कठीण भूप्रदेश, खराब हवामानस्थिती, घनदाट वने आणि सीमा भागातील लोकांच्या चालीरीती विचारात न घेता केलेली कुंपणाची बांधणी, जुळणी यामुळे वारंवार कुंपणाचा भंग होत असतो. सीमेच्या सुरक्षेकरिता तैनात केलेले सीमा सुरक्षा दल सीमेवर खूप लांबवर पसरवले, तर विस्तृत मानवविहीन, अनारक्षित फटी निर्माण होतात. ज्यांचा लाभ गुन्हेगार उठवतात.
 
काटेरी कुंपण तोडले जाणे
 
घुसखोर आणि तस्करांनी त्यांच्या कारवायांना अडथळा करणार्‍याच सुरक्षा दलांना हाताळण्याचे अतिशय मौलिक उपाय शोधून काढले आहेत. ते काटेरी कुंपण काही ठिकाणी कापतात. लांबलचक काटेरी कुंपण काही ठिकाणी सुरक्षा दलांच्या थेट निगराणीखाली नसलेल्या निर्मनुष्य भागांतूनही जात असते आणि काटेरी तारेचे कुंपण कापले गेल्यास सुरक्षा दलांवर कारवाई केली जाते. अशामुळे सुरक्षादलांना एकतर तस्करांशी जुळवून घ्यावे लागते किंवा कर्तव्यात कुचराई केल्या खातरच्या कारवाईस तोंड द्यावे लागते.
 
गुन्हेगार, प्रशासन व पोलीस यांच्यातील संगनमत
 
सीमावर्ती भागात गुन्हेगार, प्रशासन व पोलीस या तिघांमधील संगनमताच्या आधारे गुन्हेगारी फोफावत असते. अनधिकृत स्थलांतरित भारतात प्रवेश करण्यापूर्वीच काही महत्त्वाची कागदपत्रे जसे की रेशनकार्ड, गॅस कनेक्शनपत्र इत्यादी तयार करून त्यांना सुपूर्द केलेली असतात, ज्यामुळे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवले जाते आणि सीमेवर घेतल्या जाणार्‍या शोधातून ते सहज सुटू शकतात. अशा अनधिकृत स्थलांतरितांना मग देशाच्या कुठल्याही भागात पोहोचण्यास मदत केली जाते. अशा प्रकारच्या संगनमताचे एक ठळक उदाहरण, भारतातून तस्करीने बांगलादेशात नेली जाणारी गुरे, बांगलादेश सीमेपर्यंत पार मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यांतून आलेली असतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि संबंधित तपास चौक्यांवरील कर्मचार्‍यांना लाच देऊन हे साधले जात असते.
 
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे साखर, गहू, तांदूळ तस्करीने सीमापार भारताच्या बाजूच्या सीमाभागात सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे, जिच्याद्वारे साखर, गहू, तांदूळ इत्यादी वस्तू गावकर्‍यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची दुकाने सीमेपासून दूर, आतल्या भागात असतात. गावकर्‍यांना या वस्तू मात्र गावातील लोकसंख्येनुसार, एकतर गोदामांतून किंवा स्थानिक विक्रेत्यांकरवी सीमेनजीकच्या गावात आणूनविकल्या जात असतात. वाहतूक करणार्‍या विक्रेत्यास सीमा सुरक्षा दलास आवश्यकता पडल्यास, एक चिठ्ठी दाखवावी लागते. जिच्यात त्या सामानाचे वजन लिहिलेले असते. हे विक्रेते दिवसभरात अशा अनेक फेर्‍या घालत असतात. गावातील लोकसंख्येला लागेल त्याहून कितीतरी अधिक शिधा ते कुंपणाच्या पलीकडे घेऊन जातात. अशा प्रकारे वाहून नेलेले अतिरिक्त धान्य हे रात्रीच्या वेळी किंवा संधी मिळेल तसे, तस्करीने सीमापार नेले जात असते.
 
सीमापारचे नातेवाईक व नातेसंबंध
 
सीमारक्षणाच्या शिथिलतेमुळे सीमापारचे नातेसंबंध लग्नसंबंधात परिणत होत असत आणि मग संबंधी आसामात स्थिरस्थावर होतात. सीमाभागात कडक तपासणी सुरू झाल्यावर हे उत्तरोत्तर अवघड होत गेले. तरी आजही सीमापार जाऊन नातेवाईकांना भेटण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.
 
भूमीचे कायदे लागू करण्यास पडणार्‍या मर्यादा
 
गुरेढोरे पळवणे, दरोडेखोरी, माणसे पळवणे, गुन्हेगारांना पळायला मदत करणे, स्त्रिया व मुलांचा व्यापार करणे इत्यादी, सीमापार येऊन केले जाणारे गुन्हे हे एक वास्तव आणि उपजीविकेचा भाग झालेले आहे. सीमेपार पळून जाणे सोपे असते. गुन्हा करून पळून जातात आणि कायद्याचा दबाव नाहीसा होईपर्यंत बांगलादेशात सहानुभूतीदार व नातेवाईक यांच्याकडे आश्रय घेतात.
 
नैसर्गिक साधनसंपत्तीचे अपहरण
 
दोन्हीही देशांतील नागरिक, लाकूड, बांबू, चुनखडी इत्यादी सीमाभागातील सीमापारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करीत असतात. बांगलादेशात बांधकामांकरिता दगड मिळत नाही. भारतात मिळतात. म्हणून त्यांची बांगलादेशात तस्करी केली जाते.
 
सीमेवरील गहाळ झालेले स्तंभ
 
सीमेवर खुणेकरिता प्रमुख, छोटे आणि किरकोळ स्तंभ उभारलेले असतात. सीमेवर तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने, गुन्हेगारी टोळ्यांकडून, काही वेळेला तेच चोरले जातात.
 
ईशान्य भारतात गुन्हेगार, स्त्रिया आणि मुलांचा उपयोग तस्करी आणि टेहळणीकरिता, करत असतात. सीमेवर महिला पोलीस उपलब्धच नसतात. त्यामुळे स्त्रिया आणि मुलांना अटक केली जाऊ शकत नाही. गुन्हेगार याचाच पूर्ण लाभ उठवत असतात. स्त्रियांना गैरवर्तणूक दिली असे आढळून आल्यास सुरक्षा रक्षकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाते. त्याचा स्त्रियाही गैरफायदा घेताना दिसतात. त्या सुरक्षा दलांविरुद्ध खोट्या तक्रारीही करत असतात. त्यामुळे सुरक्षारक्षक, स्त्रिया व मुलांना पकडण्यास नाखूश असतात. तक्रारींपश्चात दीर्घकाळ चालणार्‍या चौकशा, सुरक्षा दलांकरिता प्रचंड तणावाचा स्रोत ठरतात. ईशान्य भारतातील सीमाभागांत महिलांची अर्ध सैनिक दलातील संख्या कमीत कमी 30-35 टक्के असली पाहिजे.
 
अमेरिका आणि मेक्सिको यामध्ये इलेक्ट्रोनिक्स सर्वेलन्स फेन्स(कुंपण) लावले आहे. असेच कुंपण बांगलादेश सीमेवर नदी आणि इतर सीमेवर जिथे घुसखोरी थांबवणे कठीण आहे, त्या सीमेवर लावले पाहिजे.
 
आज भारतामध्ये घुसखोरीच्या समस्येविरुद्ध लोकांना ज्ञान देण्याबाबत मोठे अभियान चालवण्याची गरज आहे. त्यासाठी ‘ईशान्य भारत बचाव’, ‘आसाम बचाव’ यासारखी अभियाने देशात चालवण्याची गरज आहे. याखेरीज घुसखोरांविरुद्ध प्रचार करून नागरिकांना जागरूक करण्याची गरज आहे. प्रत्येक महिन्यात प्रत्येक गावात एक दिवस घुसखोरीविरुद्ध अभियान चालवले गेले पाहिजे.
 
हेमंत महाजन 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121