रोम: मोदी, ट्रम्प आणि माझ्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या उदयामुळे जगभरातील सर्व डावे नेते चिंतेत आहेत. अशी टीका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी केली आहे.
मेलोनी म्हणाल्या की, ९०च्या दशकात जेव्हा बिल क्लिटंन आणि टोनी ब्लेअर यांनी जागतिक डाव्या विचारसरणीचे उदारमतवादी नेटवर्क निर्माण केले तेव्हा त्यांना राजकारणी म्हटले गेले. आज जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, तेव्हा त्यांना लोकशाहीसाठी धोका म्हटले जाते. हा डाव्यांचा दुटप्पीपणा आहे आणि आम्हाला त्याची सवय झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे आता लोक त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. लोक कितीही चिखलफेक करत असले तरी, ते आम्हाला मतदान करत राहतात,” असेही मेलोनी यांनी सांगितले.
मेलोनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या ‘कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स (सीपीएसी)’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडल्या गेल्या होत्या. येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचे कौतुक केले.