सर्व खाजगी केबल कंपन्यांकडून कर आकारा! राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
21-Feb-2025
Total Views | 40
मुंबई : महापालिकेच्या जमिनीत केबल्सचे जाळे टाकून भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या सर्व खाजगी कंपन्यांकडून कर आकारावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना केली आहे. शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.
याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "काही वर्षांपूर्वीपर्यंत महानगरपालिकेच्या हद्दीत जमिनीखाली केबल टाकणे किंवा इतर तत्सम गोष्टी फक्त सरकारी आस्थापनांच्या अखत्यारीतील संस्थाच करत असत. पण गेल्या काही वर्षांत जिओ, एअरटेल, वोडाफोनसारख्या मोबाईल कंपन्या, तसेच टाटा, अदानी एम.जी.एल. सारखी खाजगी आस्थापने विविध सेवा पुरवणाच्या नावावर त्यांच्या आस्थापनांच्या केबल वाहिन्या या महानगरपालिकेच्या जमिनीखाली टाकत असतात. त्यातून देणाऱ्या सेवांमधून या कंपन्या हजारों कोटींचा नफा कमवतात, पण यातून महापालिकेला शून्य उत्पन्न मिळते. एकीकडे मुंबई महापालिकेचे उत्पन्न घटत आहे, तर दुसरीकडे अशा उत्पनाच्या स्रोतांचा विचारदेखील केला जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या जमिनीत केबल्सचे जाळे टाकून भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या सर्व खाजगी कंपन्यांकडून कर आकारावा," अशी मागणी आम्ही केली.
पालिकेच्या रुग्णालयात परराज्यातील रुग्णांची संख्या अधिक!
"यासोबतच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. एका अभ्यासानुसार दरवर्षी ३० ते ३५ लाख रुग्ण हे इतर राज्यातून येतात. याचा परिणाम म्हणजे या रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण संख्येमुळे इथली व्यवस्था पार कोलमडली आहे आणि त्यामुळे मुंबईतील नागरिकांना उपचार मिळत नाही. हे चुकीचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा पुरावा म्हणून आधारकार्डावरील पत्त्याच्या आधारे रुग्णांना मुंबईतील सरकारी रुग्णलयात सेवा पुरवावी," अशी मागणीही मनसेच्या वतीने महापालिकेला करण्यात आली आहे.