मुंबई : इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरल्याने युट्यूबर रणवीर अलाहाबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंटच्या आयोजकांविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली. शोमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर करत क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कंटेंट क्रिएटर्स आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा, पॉडकास्ट रणवीर अलाहाबादिया यांच्यासह कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमाच्या एका भागात दिसले होते. दरम्यान, इलाहाबादियाने कार्यक्रमादरम्यान एका स्पर्धकाच्या पालकांमधील असलेल्या नातेसंबंधांबद्दल वादग्रस्त सवाल उपस्थित केला. त्यांनी केलेली ही टिप्पणी व्हायरल होत असून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणखी काही व्हिडिओमध्ये एका स्पर्धकाला शिवीगाळ करण्यात आली. तसेच खालच्या पातळीवर टीप्पणीही करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, संबंधित व्हिडिओ क्लिप जरी पाहिली नसली तरीही त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी मान्य केले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि सामाजिक नियमांचे उल्लंघन करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रणवीर, मुखिज, रैना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर अनेक प्रकारच्या आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर विनोद केल्याप्रकरणी टीका करण्यात आली.