मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : बीड प्रकरणात दोषीला सोडले जाणार नाही
17-Jan-2025
Total Views | 135
नागपूर : उज्वल निकम यांच्या नियूक्तीवर राजकारण करणे म्हणजे कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्या नियूक्तीवर कुणीही राजकारण करू नये, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तपास यंत्रणा रोज सगळ्या गोष्टी बाहेर सांगू शकत नाहीत. तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू द्यायला हवे. कुठल्याही परिस्थितीत दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही. याठिकाणी उज्वल निकम यांच्यासारखे वकील नेमण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांना आम्ही विनंतीसुद्धा केली आहे. परंतू, मला नेमल्यानंतर विनाकारण काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात, हे योग्य वाटत नाही, असे त्यांनी बोलताना मला सांगितले."
"देशात अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत. त्याचे राजकारण होत नाही. परंतू, उज्वल निकम यांच्या नियूक्तीवर राजकारण करणे म्हणजे कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे. उज्वल निकम यांच्याकडे केस गेल्यावर खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होतेच, हा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे आता कुणाला गुन्हेगारांना वाचवायचे असेल तर ते उज्वल निकम यांचा विरोध करतील," असे ते म्हणाले.
दावोस दौऱ्यातून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार!
दावोस दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, "दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होणार आहे. याठिकाणी जगातील सगळे व्यावसायिक नेते आणि राजकीय नेते एकत्रित येतात. तिथे मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होऊन विचारांचे आदानप्रदान होते. तसेच गुंतवणूकीचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होते. याठिकाणी व्यावसायिकांशी माझ्या अनेक महत्वाच्या बैठकी ठरलेल्या आहे. मला तिथे चांगल्या गुंतवणूकीच्या संधी दिसत आहेत. याद्वारे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यात आम्ही यशस्वी होऊ," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीत भाजपचे सरकार येणार!
"दिल्लीच्या जनतेचा अरविंद केजरीवालांवरून विश्वास उडाला असून मोदीजींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार आणण्याची त्यांची ईच्छा आहे. त्यामुळे यावेळी दिल्लीत भाजपचे सरकार येणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांचे काम सुरु!
"सैफ अली खान प्रकरणात पोलिसांनी जी माहिती दिली त्याव्यतिरिक्त अद्याप कुठलीही माहिती नाही. पोलिसांकडे बरेच सुगावे आहेत आणि ते त्यावर काम करत आहेत. यासंदर्भात ते सगळी कारवाई पूर्ण करतील," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.