पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या 'आप' विरोधात एफआयआर दाखल
14-Jan-2025
Total Views | 194
नवी दिल्ली : दिल्लीमधील नॉर्थ एव्हेन्यू पोलीस ठाण्यामध्ये आप विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच आम आदमी पक्षाने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले आहेत. या ट्विटबाबत भाजपने आम आदमी पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आम आदमी पक्षाने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या फोटोंसह एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली असून त्यामुळे आम आदमी पक्षाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
आम आदमी पक्षाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर अनेक पोस्ट शेअर केल्या असल्याची माहिती समोर आली. यामध्ये काही पोस्ट त्यांनी भाजपला उद्देशून केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पक्ष आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. हे सर्व संबंधित एआय बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आल्या आहेत. याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. संबंधित अकाऊंटमध्ये गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरले होते. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाचा वापर करत तयार करण्यात आले होते. ज्यात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या.
याप्रकरणी आता दिल्ली भाजपने आम आदमी पक्षाने केलेल्या कृत्यावर आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री आतिशी यांच्यावरही निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपास सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.