कळवा - मुंब्यातील आठ माजी नगरसेवक अजितदादांच्या गोटात
24-Jul-2024
Total Views | 145
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्याच्या पठ्ठयाला जोर का धक्का दिला आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक असलेल्या तब्बल ८ माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजितदादा गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना मध्यंतरी ठाण्यात आलेल्याअजितदादानी आमदार जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख ठाण्याचा पठ्ठया असा करीत टीकास्त्र सोडले होते.
त्यानंतर वारंवार आव्हाडांकडून अजितदादा गटाला टार्गेट केले जात असताना दादांनी या पठ्ठयाला चांगलाच धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रिटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली गोटे, नगरसेविका आशरीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत,नगरसेवक शेख जफर नोमानी, नगरसेविका हफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफील शेख,नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सर्फराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सर्फराज अन्सारी, हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहफूज शेख, सय्यद शमविल यांनी आपल्या हातात पुन्हा घड्याळ बांधले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला हे उपस्थित होते. यावेळी, माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा-कळवा प्रवक्तेपदी, मेहफूज (मामा) शेख यांची शीळ डायघर ब्लॉक अध्यक्षपदी, सय्यद शमवील याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा-कळव्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.