"राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा..."; वर्धापन दिन सोहळ्यात एकनाथ शिंदेंचा उबाठावर घणाघात
20-Jun-2025
Total Views | 32
मुंबई : राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील डोम सभागृह येथे शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. इतकी वर्षे सत्तेत राहून महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना आता मुंबईचा लढा आठवला का? कोविड सेंटर, खिचडी, बॉडीबॅग, कचरा, मिठी नदी गाळ, रस्त्यांवर खड्डे आणि डांबरात पैसे खाल्ले तसेच मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ केलात. आता मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही. आता एका डिनोची चौकशी सुरु आहे, त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल," असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, "मुंबई महापालिका ही सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे असे त्यांना वाटते. निवडणूक आली की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र असल्याचा कांगावा काहीजण करतात. पण मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, कुणाचा बाप जरी आला किंवा सात पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. काही लोकांना निवडणूका आल्यावर जनतेची आणि कार्यकर्त्यांची आठवण येते. एरवी त्यांचे हम दो हमारे दो एवढेच असते. निवडणूकांचे वारे फिरू लागल्यावर त्यांना हिंदूत्व आणि मराठी माणूस आठवतो आहे. परंतू, ज्यांनी विश्वासघात केला, ज्यांनी मतदारांशी बेईमानी केली ते मतदार तुम्हाला या निवडणूकीतसुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाही," असेही ते म्हणाले.
आगामी निवडणुकीत मुंबईसह सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सज्ज राहा. येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत. कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा," असे आवाहनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांना केले.