"एक गोष्ट लक्षात ठेवा..."; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा

    24-Jul-2024
Total Views | 88
 
Fadanvis & Deshmukh
 
मुंबई : एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला आहे. ईडीच्या आरोपांमधून सुटका मिळवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्रांवर सही करण्याचा अनिल देशमुखांवर दबाव आणण्यात आला होता, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. यावर आता फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सीबीआयने नुकतेच एक आरोपपत्र दाखल केले आहे. यात यात गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दबाव टाकला असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वत: दिले होते आणि यावरच सीबीआयकडे केस झाली. यामध्ये आता सीबीआयने पुराव्यासहित कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कशाप्रकारे विरोधी पक्षांच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसमध्ये फसवण्याचं काम झालं, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे."
 
हे वाचलंत का? - गिरीश महाजनांच्या अटकेसाठी एसपींना अनिल देशमुखांची धमकी!
 
"अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर आमचं सरकार नव्हतं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी देशमुखांविरुद्ध एफआयआर करायला लावला होता. हे त्यांच्याच सरकारमध्ये झालं. त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि आता जामीनावर बाहेर आहेत," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "माझ्यावर सातत्याने आरोप करत असतानाही मी आजपर्यंत बोललो नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर त्याला सोडत नाही, हा माझा स्पष्ट सिद्धांत आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या पक्षातील लोकांनीच त्यांचे काही ऑडीओ व्हिज्युअल्स मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल, पवार साहेबांबद्दल काय बोलतात, वाझेवर ते काय बोलतात, या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या लोकांसमोर आणाव्या लागतील. मी असं राजकारण करत नाही. पण रोज जर कुणी खोटं बोलून असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही," असा थेट इशाराच फडणवीसांनी दिला आहे.
 
श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, "श्याम मानव मला इतके वर्ष ओळखतात. त्यामुळे त्यांनी असे आरोप करण्याआधी पहिल्यांदा मला विचारायला हवं होतं. पण दुर्दैवाने अलिकडच्या काळात इकोसिस्टममध्ये सुपारीबाज लोकं घुसलेले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागलेत का? असा प्रश्न मला पडतो आहे," असे ते म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121