मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी 'प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा'ची स्थापना करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना या प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स. १६५६ मध्ये पार पडले. दि. १० नोव्हेंबर १६५९ साली याच किल्ल्याच्या पायथ्याशी शिवरायांनी वाघनखांच्या सहाय्याने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला. मराठा लष्करी वास्तू स्थापत्याचा वैश्विक नमूना असलेल्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी केंद्र सरकारने युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे. त्यात प्रतापगडाचाही समावेश आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील 'प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा'त नितीन शिंदे, मिलिंद एकबोटे, शरद पोंक्षे, सदाशिव टेटविलकर, सोमनाथ धुमाळ, चंद्रकांत पाटील, पंकज चव्हाण, अमोल जाधव यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.