केंद्र सरकारतर्फे २५ जून ‘संविधान हत्या दिन’ घोषित
आणीबाणीच्या बळींना श्रद्धांजली अर्पण करणारा निर्णय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
12-Jul-2024
Total Views | 43
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी आणीबाणीचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकारने २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. तशी राजपत्रित अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली आहे. देशात लादण्यात आलेल्या आणीबाणीस यंदाच्या वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लादली होती.
त्यामुळे केंद्र सरकारने राजपत्रित अधिसूचना जारी करून २५ जून हा दिवस आतापासून दरवर्षी ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला.
भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामागचा उद्देश हुकूमशाही सरकारच्या अगणित यातना आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे.
‘संविधान हत्या दिन’ लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्यासाठी कार्य करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही, असेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यावेळी म्हटले आहे.
भारतीय इतिहासातील काळ्या टप्प्यास काँग्रेस जबाबदार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित करणे हा आणीबाणीतील अतिरेकामुळे बळी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्रद्धांजली आहे. भारतीय संविधान पायदळी तुडवताना काय झाले होते आणि भारतीय इतिहासातील काळ्या टप्प्यास काँग्रेस पक्ष कसा जबाबदार आहे, हे यानिमित्ताने देशासमोर येईल; असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.