सिक्कीममध्ये SKM पक्षाची ३२ पैकी ३१ जागांवर आघाडी; काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मतदान
02-Jun-2024
Total Views | 158
गंगटोक : देशात लोकसभा निवडणूकींच्या सोबत आंध्र प्रदेश, ओडिसा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका झाल्या होत्या. यातील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज, दि. ०२ जून २०२४ होत आहे.
सिक्कीममध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ३२ विधानसभा जागांपैकी विद्यमान मुख्यमंत्री प्रेम तमांग यांचा पक्ष सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा ३१ जागांवर आघाडीवर आहे. हे स्पष्ट आहे की SKM सिक्कीममध्ये प्रचंड बहुमत मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०१९ च्या निवडणुकीत एसकेएम ने ३२ पैकी १७ जागा मिळवून सरकार स्थापन केले होते.
सिक्कीम विधानसभा निवडणूकीत यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाना आपलं खात उघडता आलं नाही. मात्र, भाजप या निवडणूकीत पाच टक्के इतकं मतदान मिळवण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला सिक्कीम विधानसभा निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मतदान मिळालं आहे.
कोण आहेत SKM नेते प्रेमसिंग तमांग?
मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हे २०१३ पर्यंत सिक्कीममधील सत्ताधारी एसडीएफचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पवन चामलिंग यांच्यासोबत एसडीएफची स्थापना केली होती आणि सत्तेवर आले होते. तेव्हा ते सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. पण २०१३ मध्ये चामलिंग यांच्याशी राजकीय संघर्ष झाल्यानंतर त्यांनी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा नावाचा नवा पक्ष स्थापन केला.
२०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष एसकेएण ने ३२ पैकी १७ जागा जिंकल्या आणि प्रेमसिंग तमांग मुख्यमंत्री बनले. लोकसभा निवडणुकीसोबतच, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एसकेएम ची सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) सोबत थेट लढत होती, ज्यामध्ये SKM ला पुन्हा मजबूत बहुमत मिळत असल्याचे दिसते.