जगातील सर्वात आधुनिक देश असलेल्या अमेरिकेत आजही जुनाट पद्धतीने मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान केले जाते. तेथे क्वचितच ‘ईव्हीएम’चा वापर केला जातो. तेथील ‘ईव्हीएम’ कशी आहेत, त्याची भारतातील कोणालाही माहिती नाही. भारतीय ‘ईव्हीएम’ची कार्यक्षमता आणि अचूकता आजवर असंख्य वेळा तपासून आणि सिद्ध करून झाली आहे. म्हणूनच मस्क यांच्या ‘ईव्हीएम’वरील शेरेबाजीला काडीइतकेही महत्त्व नाही. उलट, त्यांच्या विधानाला पाठिंबा देऊन विरोधकांनी आपला बौद्धिक नादानपणा उघड केला आहे, हेच खरे!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी केलेल्या एका विधानाने भारतातील विरोधकांच्या अंगात संचार झाला. जगातील कोणतेही ‘ईव्हीएम’ हॅक केले जाऊ शकते, असे अत्यंत बेजबाबदार आणि आक्षेपार्ह विधान मस्क यांनी करून अप्रत्यक्षपणे भारतातील ‘ईव्हीएम’बाबत संशय निर्माण केला आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेशसिंह यादव यांना आनंदाचे भरते आले. त्यांनी भारतातील ‘ईव्हीएम’वर पुन्हा एकदा संशय व्यक्त करून त्यांचा वापर बंद करण्याची मागणी केली. भारताचे माजी आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यासंदर्भात खुलासा करून ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेची ग्वाही दिली. विरोधी नेत्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. पण, मस्क यांच्यासारख्या व्यक्तीच्या एक आगापिछा नसलेल्या वात्रट विधानाला जगातील अंतिम सत्य असल्यासारखे भासविण्याच्या प्रयत्नात या नेत्यांनी आपला नादानपणा उघड केला आहे.
एलॉन मस्क यांनी हे विधान का केले, त्यांना ‘ईव्हीएम’बद्दल कितपत माहिती आहे, हे कोणालाच ठाऊक नाही. मुळात अमेरिकेत मतदान हे आजही मतपत्रिकेवर शिक्का मारूनच केले जाते. जगातील सर्वात आधुनिक देशात आजही या जुनाट पद्धतीनेच मतदान केले जाते. त्यामुळे अमेरिकी व्यक्तीने भारतातील ‘ईव्हीएम’वर बेधडक शेरेबाजी करणे, हे अतिशय नादानपणाचे आहे. मस्क यांना अशा प्रकारचे विधान करण्यामागील हेतू संशयास्पद मानावा लागेल. कारण, भारतातील कोणत्याही महान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत संशय निर्माण करणे हे अमेरिकेतील बड्या उद्योगपतींचे कारस्थान आहे. हिंडेनबर्ग अहवालाने या टूलकिटवाल्यांचे खरे हेतू उघड केले आहेत. मुळात भारतातील ‘ईव्हीएम’बाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार मस्क यांना कोणी दिला? त्यांनी कोणत्या आधारावर हे विधान केले आहे, ते स्पष्ट केले पाहिजे.
भारतीय निवडणूक आयोग आणि ही यंत्रे बनविणार्या सरकारी कंपनीच्या उच्चपदस्थ तंत्रज्ञांनी आजवर असंख्य वेळा या ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेची चाचणी सिद्ध करून दाखविली आहे. ही यंत्रे हॅक कशी करता येतील, त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे त्यांनी दिलेले आव्हान आजवर कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा त्यांच्या बाजूच्या तंत्रज्ञाला यशस्वीपणे पेलता आलेले नाही. या ‘ईव्हीएम’ यंत्रांवर दुरून (रिमोट) किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने नियंत्रण आणता येईल, असे मस्क यांनी सूचित केले असले, तरी ती शक्यताही भारतीय तंत्रज्ञांनी फेटाळून लावली आहे. कारण, ही यंत्रे इंटरनेटशी जोडलेली नसतात. प्रत्येक ‘ईव्हीएम’ हे स्वतंत्र युनिट असते.
संगणक किंवा मोबाईल हे इंटरनेटशी जोडलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण बसविणे शक्य असते. पण, भारतीय ‘ईव्हीएम’ ही कोणत्याही इंटरनेटशी किंवा वाय-फायसारख्या तंत्रज्ञानाशी जोडलेली नसतात. त्यामुळे त्यांच्यातील चिपवर बाहेरून कोणालाही नियंत्रण मिळविता येत नाही. ही चिपही विशिष्ट प्रकारे बनविलेली असल्याने तिच्या रचनेत बदल करणे अशक्य असते, हेही राजीव चंद्रशेखर आणि भारतीय तंत्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. याउपरही ज्यांना त्यावर संशय घ्यायचा आहे, त्यांना त्यापासून परावृत्त करणे कोणाच्याही हाती नाही. पण, अशा लोकांनी ठोस पुराव्याशिवाय बोलणे हे चारित्र्यहननाइतकेच गंभीर मानले पाहिजे.
दुसरे असे की मतदानापूर्वी या ‘ईव्हीएम’चे सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष प्रात्यक्षिक घेतले जाते. त्यांच्या संमतीनंतरच ही यंत्रे वापरली जातात. मतदान झाल्यावर ती यंत्रे या प्रतिनिधींच्या समक्ष सील केली जातात व त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली जाते. त्यांच्या देखरेखेखाली ती स्ट्राँग रूममध्ये बंद केली जातात आणि त्यावर मतमोजणीच्या दिवसापर्यंत सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे 24 तास लक्ष ठेवले जाते. लक्ष ठेवण्यासाठी सर्व पक्ष आपले कार्यकर्ते किंवा प्रतिनिधी या स्ट्राँग रूमबाहेर तैनात करतात. या सर्वांचे चित्रण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आले होते. तसेच लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यावर एकाही विरोधी पक्षाने ‘ईव्हीएम’च्या निकालांवर आक्षेप किंवा संशय घेतलेला नाही आणि या निकालांचा सर्वांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे ‘ईव्हीएम’च्या हॅकिंगचे चर्हाट आता बंद झाले पाहिजे.
मुळात मस्क यांच्या वक्तव्याला इतके महत्त्व देण्याचे कारणच काय? ते काय ‘ईव्हीएम’संदर्भातील कोणी तज्ज्ञ व्यक्ती आहेत? त्यांना भारतात तयार केलेल्या ‘ईव्हीएम’च्या कार्यपद्धतीची माहिती आहे काय? त्यांचा या यंत्रांशी आणि भारतातील निवडणूक प्रक्रियेशी काय संबंध? एका उपटसुंभ व्यक्तीने आगाऊपणे केलेल्या बेताल वक्तव्याची आपल्या राजकीय सोयीसाठी भारतातील विरोधी पक्षांनी री ओढावी, हे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आजवर ‘ईव्हीएम’च्या हॅकिंगसंदर्भात व्यापक आणि सखोल चर्चा झाली आहे.
‘ईव्हीएम’ हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले एक लाख रुपयांचे आव्हान आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा तंत्रज्ञाने स्वीकारलेले नाही. त्यामुळे याबाबतची चर्चा आता थांबायला हवी. मस्क यांनी हे आव्हान स्वीकारावे. पण, आपल्या राजकीय अपयशावर पांघरूण घालण्यासाठी विरोधकांना इव्हीएमची सबब मिळाली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी जनतेच्या मनात त्यांना ‘ईव्हीएम’बाबत कसलाही संशय निर्माण करता आलेला नाही. भाजपला ‘ईव्हीएम’ हॅक करता येत असते, तर त्यांनी स्वत:ला लोकसभेतील बहुमतापासून वंचित ठेवले असते की त्यापेक्षा अधिक जागी आपल्याला जिंकविले असते, हा कॉमनसेन्सचा प्रश्न आहे.
मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असले, तरी त्यांचे चरित्र वादग्रस्त आहे. त्यांच्याच महिला कर्मचार्यांनी त्यांच्यावर विनयभंग केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या कंपनीतील काही उच्चपदस्थ महिला अधिकार्यांनी मस्क यांच्या लंपटपणाला कंटाळून आपली नोकरीही बदलली आहे. मस्क यांचा स्त्रीलंपटपणा इतक्या थराला गेला आहे की, मस्क यांनी आपल्याच एका महिला कर्मचार्याला आपल्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची विनंती केली. कारण, त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा वारसा पुढे नेण्यासाठी अपत्य निर्माण करण्याची गरज वाटत होती. यासारखे उथळ आणि निर्लज्ज विचार असलेल्या व्यक्तीने केलेल्या एका बाष्कळ आणि बिनबुडाच्या विधानाला महत्त्व देणे, हे आपल्या निर्बुद्धपणाचे निदर्शक आहे.