जामीन मिळवण्यासाठी केजरीवालांनी केला खोटा दावा? तुरूंगात वजन कमी होण्याच्या जागी १ किलोने वाढलं
31-May-2024
Total Views | 53
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करताना अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की, एका महिन्यात त्यांचे वजन सात किलोने विनाकारण कमी झाले आणि ही आरोग्याची गंभीर समस्या आहे. अंतरिम जामीन ७ दिवसांनी वाढवण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांनी हे दावे केले होते. केजरीवालांच्या या दाव्यावर विश्वास ठेवण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला.
त्यातचं तिहार तुरुंगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की तुरुंगात असताना केजरीवालांच्या वजनात कसल्याही प्रकारचा लक्षणीय बदल झाला नाही. भटिंडा येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल सोमवारी म्हणाले, “माझे वजन खूप कमी झाले आहे. कोणत्याही कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीचे वजन महिन्याभरात सात किलोने कमी होत असेल तर ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अनेक चाचण्या करण्याच्या सल्ला दिला आहे.
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले होते की, "मी माझ्या सर्व चाचण्या एका आठवड्यात पूर्ण करण्यासाठी ७ दिवस मागितले आहेत. मला काही गंभीर आजार होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितले की जर सर्व चाचण्या केल्या तर निदान आम्हाला कळेल की शरिरात काही गंभीर आजार आहे की नाही."
त्यातचं आता, केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत तिहार तुरुंगातून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवरून हे सर्व दावे खोटे असल्याचे उघड झाले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात दि. ३० मे २०२४, तिहार तुरुंगाच्या वरिष्ठ वैद्यकीय प्रभारींनी १ एप्रिल ते ९ मे या सहा वेगवेगळ्या दिवशी केजरीवाल यांच्या शरीराच्या वजनाचा तपशील दिला, ज्यावरून त्यांचे वजन ६५ किलोवरून ६४ पर्यंत घसरल्याचे दिसून येते.
याचं दरम्यान त्यांचे वजन ६६ किलो इतके सुद्धा झाले होते. त्यामुळे, जेव्हा अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते, तेव्हा त्यांचे वजन जवळजवळ स्थिर होते, आणि केजरीवाल आणि इतर आप नेत्यांनी दावा केल्याप्रमाणे सात किलो वजन कमी झाले नाही.