"आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही"; मिशनरी अजेंडा चालवणाऱ्या EU ची मदत मणिपूर सरकारने नाकारली
31-May-2024
Total Views |
इंफाळ : मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. दरम्यान, युरोपियन युनियनने (EU) मणिपूरच्या लोकांच्या मदतीसाठी अडीच लाख युरो देण्याची घोषणा केली होती, मात्र मणिपूर सरकारने ती फेटाळली आहे. ईयू ने पाठवलेली २.५ लाख युरोची रक्कम भारतीय चलनात सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या बरोबर आहे.
मणिपूर सरकारने सांगितले की आम्ही बाधित लोकांना मदत करण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि लोकांपर्यंत मदत पोहोचत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला बाहेरच्या मदतीची गरज नाही. ईयू ने दि. २९ मे २०२४ रोजी मणिपूरच्या आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी २.५ लाख युरो पाठवत असल्याची घोषणा केली होती. यामुळे १५०० कुटुंबांना मदत होणार आहे.
विशेष बाब म्हणजे ज्या एनजीओच्या मदतीने ईयू ही मदत करत आहे ती सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च चालवते. अशा परिस्थितीत चर्चच्या पैशातून एका विशिष्ट समुदायाला पैसे देण्याची योजना मणिपूरमध्ये आखली जात होती, परंतु मणिपूर सरकारने ते चुकीचे ठरवले आहे आणि आम्ही आमच्या सर्व नागरिकांची समान काळजी घेत असल्याचे म्हटले आहे. मणिपूर सरकारनेही युरोपियन युनियनवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे.
मणिपूर सरकारने या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. मणिपूर सरकारने सांगितले की, 'राज्यात अलीकडच्या काही दिवसांत आलेल्या वादळामुळे बचाव कार्याशी संबंधित सर्व खर्च राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल करत आहेत. वादळाशी संबंधित मदतकार्य संबंधित उपायुक्त, सुरक्षा दल आणि सार्वजनिक स्वयंसेवकांमार्फत केले जात आहे.
मदत आणि बचावाचे काम कोणत्याही स्वयंसेवी संस्था किंवा नागरी संस्थेकडे सोपवण्यात आलेले नाही, असेही सरकारी अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, मणिपूर सरकारने वादळाचा फटका बसलेल्या राज्यातील जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आधीच ३० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या वेळी ईयू ने आपल्या संसदेत या विषयावर चर्चेचे आयोजन केले होते. याला भारत सरकारने कडाडून विरोध केला होता. त्याच वेळी, ज्या चर्च एनजीओच्या माध्यमातून ईयू ने ही मदत रक्कम पाठवली होती ती अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याचबरोबर ख्रिश्चन संघटनांनाही मणिपूर हिंसाचाराशी जोडले जात आहे.