सावरकरांचे म्हणून आपल्याला ज्ञात असलेल्या पॅरिसमधल्या मार्सेलिस बंदरापासून काही अंतरावर असणार्या पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या जवळ असलेल्या किनार्यावरील शहरात होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय टेबलटेनिसचा संघ नुकताच जाहीर झाला आहे. त्या संघाबद्दल आणि एकंदरीतच टेबलटेनिसबद्दल या लेखात आपण जाणून घेऊया...
टेटे आणि हॉकी...
भारतीय हॉकीचे संघ सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या, हॉकी प्रो लीग २०२३-२४ मोहिमेच्या अंतिम भागासाठी बेल्जियम आणि लंडन येथे दि. २२ मे ते दि. ९ जून या कालावधीत आहेत. भारतीय पुरुष संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला असला, तरी महिलांना यापासून वंचित राहावे लागत आहे. महिला हॉकी संघ सध्या उच्च स्थानावर पोहोचण्याची मनापासून धडपड करत आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व, सध्या जनजाती क्षेत्रातून आलेली झारखंडची ऑलिम्पिकपटू ’सलीमा टेटे’ ही करत आहे. ’सलीमा टेटे’ हिच्या नेतृत्वाखालील संघ आता, हॉकी प्रो लीगच्या त्यांच्या उर्वरित सामन्यांतून, जास्तीतजास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. सध्या कर्णधारपदी असलेल्या ’सलीमा टेटे’च्या अगोदर, महिला संघाचे नेतृत्व अनेकांनी भूषविले आहे. त्यात हरियाणाची ’राणी रामपाल’सारखी महिला जशी होती, तशी आदिवासी समाजातून आलेली ’असुंता लाक्रा’ ही देखील होती. ’असुंता लाक्रा’ व ’सलीमा टेटे’ या हॉकीच्या जनजाती कप्तानांआधी, झारखंडच्याच आदिवासी पट्यातून आलेली, ’सुमराय टेटे’ नावाची हॉकीपटू भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व करून गेली आहे. भाऊ, मुलगा किंवा मित्र असा सर्वसामान्यतः या जनजातीय नामावलीत असलेल्या, ‘टेटे’चा भावार्थ. क्रीडेद्वारे मैत्रीचे द्योतक असलेल्या टेटेंच्या ’सलीमा टेटे’चा संघ जरी पॅरिसला जाणार नसला, तरी सर्वसामान्यतः सर्वजण ज्या क्रीडाप्रकाराला ओळखतात ,तो टेटेचा भारतीय संघ अर्थात टेबल टेनिस संघ तिथे उतरणार आहे. या पॅरिसवारी करणार्या टेटे या ऑलिम्पिक क्रीडाप्रकारासंबंधी आपण या लेखात चर्चा करणार आहोत.
‘दिवाणखानी टेनिस’
पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयजवळील, टिळक स्मारक मंदिर परिसरात एक क्रिकेटपटू तसेच क्रिकेट आणि बहुविध क्रीडाप्रकारांचे ज्ञानी व गाढे अभ्यासक, हिंदी, इंग्रजी भाषांबरोबरच अस्खलित मराठी भाषेतूनही ’आकाशवाणी’वर विविध सामन्यांचे धावते समालोचन करणारे ’बाळ पंडित’ (बाळ जगन्नाथ पंडित) हे होऊन गेले. ’बाळ ज. पंडितां’चे वडील ’सरदार जगन्नाथ महाराज पंडित’ यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. त्यांनी टेबलटेनिसवरही विपूल लेखन केले होते. नुकताच बाळ ज. पंडितांचा टेबलटेनिसवरील एक लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी टेबलटेनिसचा ‘दिवाणखानी टेनिस’ असा उलेख केलेला आढळला. पुढे टेबलटेनिसचा इतिहास उलगडताना समजले की, एका पारकर बंधूंनी ‘दिवाणखानी टेनिस’ हा खेळ अमेरिकेत सुरू केला होता. पारकर बंधूंनी, या खेळाचे साहित्य इंग्लंडला निर्यात केले. त्या जोरावर इंग्लंडनेही हा खेळ आत्मसात केला. टेबलटेनिसचा उगम लॉन टेनिसपासून झाला असावा. सुरुवातीला उच्चवर्गीय इंग्रजी कुटुंबांमध्ये, रात्रीच्या जेवणानंतर मनोरंजन म्हणून हा ‘दिवाणखानी टेनिस’चा खेळ खेळला जात असे. त्यासाठी जे काही मिळेल, ते क्रीडा साहित्य म्हणून वापरले जाई. त्यावेळी, ते टेबलावरची पुस्तके जाळी म्हणून, सिगार बॉक्सचे झाकण रॅकेट म्हणून आणि गोल शॅम्पेनची बाटली, त्याची बुचे चेंडू म्हणून वापरत. आधी या क्रीडाप्रकाराचे नाव ‘पिंगपाँग’ असे होते. ‘पिंगपाँग’ याचा लॅटिन भाषेत ‘टेबल’ असा अर्थ होतो. मग पुढे तेच नाव या खेळाला पडले. ‘गॉसीमा’ असेही दुसरे एक नाव या खेळाला होते. १८९०च्या सुमारास टेबलटेनिसचा हा खेळ सुरू झाल्यावर ,१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्येच हा खेळ सुरू झाला, असेही एक मत आहे. ‘व्हीपव्हॅप’ हे अजून एक नाव या खेळाला होते. १९०२ साली इंग्लंडमध्ये ‘पिंगपाँग असोसिएशन’ची स्थापना झाली. पण पुढे २० वर्षे हा खेळ लुप्तप्राय झाला. १९२२ पासून ‘पिंगपाँग असोसिएशन’चे व खेळाचे नाव बदलण्यात आले आणि ‘टेबलटेनिस’ हे नाव अस्तित्वात आले. त्यानंतर हा खेळ जोमाने बहरला. जर्मनी, हंगेरी, इंग्लंड या राष्ट्रांच्या पुढाकाराने १९२६ साली, ‘इंटरनॅशनल फेडरेशन’ची स्थापना झाली. इंग्लंड, स्वीडन, हंगेरी, भारत, डेन्मार्क, जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया आणि वेल्स हे त्या फेडरेशनचे संस्थापक-सभासद आहेत. ‘आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस संघटने’मध्ये १९७० पर्यंत ९० राष्ट्रीय संघटनांनी सभासदत्व स्वीकारले होते. ‘आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस संघटने’मध्ये सध्या जगभरातील, २२६ सदस्य संघटनांचा समावेश आहे. टेबलटेनिसचा खेळ एक हिरव्या रंगाचे टेबल, रॅकेट्स व एक कचकड्याचा पांढरा किंवा पिवळा गोल बारिक चेंडू, आणि एक हिरव्या रंगाचे जाळे एवढ्या साहित्यानिशी खेळला जातो. थोड्या जागेत, अल्प वेळेत व अल्प खर्चात टेबलटेनिसचा खेळ खेळता येत असल्याने, तो घरातही जणूकाही मेजावरील खेळ म्हणून प्रसिद्ध झाला.
कापूर व कचकड्याचा चेंडू...
टेबलटेनिसच्या चेंडूचा तुम्ही जर कधी वास घेतला असेल, तर तुम्हाला देवाच्या षोडशोपचार पूजेत, मंगलारती झाल्यावर कापराची आरती करतात, त्यासाठी वापरण्यात येणार्या कापूराची आठवण येईल. कारण टेबलटेनिसचा चेंडू तुटल्यावर तुमच्या लक्षात येणारा तो कापूरासारखा वास, हा ते चेंडू बनविण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणार्या साहित्याचा परिणाम आहे, जसे की, सेल्युलॉइड किंवा इतर प्लास्टिक संयुगे. टेबलटेनिसच्या चेंडूत वापरली जाणारी रासायनिक संयुगे, ही ज्वालागृही समजली जातात. सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या कारणांमुळे आजकाल बनविले जाणारे टेबलटेनिसचे चेंडू, हे ’सेल्युलॉइड’पेक्षा भिन्न सामग्रीपासून बनविले जाऊ लागले आहेत. सर्वसाधारणतः चित्रपट छायाचित्रणाच्या प्रक्रियेतही ’सेल्युलॉइड’चा वापर करतात. शास्त्रीयदृष्टीने पाहिले तर, ’सेल्युलॉईड’ हे ’नायट्रोसेल्युलोज’आणि कापूरउत्पादनाच्या सामग्रीचा एक वर्ग आहे. तथापि, टेबलटेनिसच्या चेंडूचा येणारा एक विशिष्ट वास हा त्याच्या उत्पादनात वापरल्या जाणार्या प्लॅस्टिकच्या स्वरुपामुळे अजूनही तसाच आहे.
टेटे झाला वेगवान
भारतात पुरुष, स्त्रिया, मुले व मुली यांच्यामधील एकेरी, दुहेरी व मिश्र स्वरुपाचे सामने प्रतिवर्षी राज्य, राष्ट्रीय पातळीवर होतात. भारतात या खेळाचे नियंत्रण ‘टेबलटेनिस फेडरेशन ऑफ इंडिया’ (स्थापना १९३८) ही संस्था करते. इंग्लंडमधील खुल्या स्पर्धांची सुरुवात १९२१ पासून झाली. १९५३-५४ पासून ’जपान’ व ’चीन’ या आशियातील राष्ट्रांनीही, या खेळात चमक दाखविली. अलीकडे पुरुष व महिला विभागात, चीनचे खेळाडू सर्वश्रेष्ठ ठरताना दिसतात. १९३६ साली ’स्वेदलींग कप’मधील निर्णायक सामना प्राग येथे, २५ तास चालला होता, तर १९६७ साली दुहेरीतील एक सामना लंडन येथे तब्बल २०४ तास चालला होता. पण हल्ली, या खेळास वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. खेळ सुरू झाल्यापासून १५ मिनिटांत जर डाव पुरा झाला नाही, तर शीघ्र-गति-पद्धतीने (एक्सपिडाइट रूल) खेळावे लागते. त्या पद्धतीनुसार आरंभखेळी करणार्याने १२ ‘रॅलीज’ मध्ये गुण मिळविला पाहिजे. अन्यथा प्रतिपक्षास गुण मिळतो. वरील नियम ज्या वेळेस लागू होतो, तेव्हापासून उरलेला डाव आणि पुढील संपूर्ण सामना या पद्धतीनुसारच खेळावा लागतो. यावेळी प्रत्येक गुणानंतर आरंभखेळी बदलते. या पद्धतीमुळे टेबलटेनिसचा खेळ हल्ली अतिशय वेगवान झालेला आहे.
कामाच्या टोलवाटोलवीचा खेळ
असा हा कचकड्याचा चेंडू, एकाने दुसर्याकडे जाळीवरून चेंडू मारणे, आणि त्याने तो परतविणे या क्रिया मैदानावरील लॉन टेनिसप्रमाणे टेबलटेनिसमध्येही महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एकप्रकारे टोलवाटोलवीच. या खेळात एक टप्पा पडल्याबरोबर चेंडू परतवायचा असल्याने, दोन्ही खेळाडूंना सतत हालचाल करावी लागते. त्यामुळे चापल्य आणि निर्दोष दृष्टी यांची कसोटीच लागते. टेबलटेनिसचा चेंडू टेबलावर रॅकेटने सतत टोलवित ठेवावा लागतो. नाहीतर प्रतिस्पर्धी खेळाडूला त्याचा लाभ मिळतो. म्हणून टोलवाटोलवीची या खेळातील खुबी, अपप्रवृत्तीच्या राजकारणी आणि सरकारी अधिकार्यांना विशेष भावत असावी. कारण, असे टेबलटेनिससारखे खेळण्याऐवजी, आपल्या कामाची चालढकल, झुलवाझुलव, टाळाटाळ करीत टोलवाटोलवीचा खेळ खेळणारे अधिकारी म्हणूनच लोकांना प्रिय नसतात. असो. आता आपण आपले लक्ष केंद्रित करू भारतीय टेबलटेनिसपटूंकडे.
भारतीय टेबलटेनिस आणि ऑलिम्पिक...
’शरत कमल’ आणि ’मोनिका बात्रा’ २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणार्या सहा सदस्यीय भारतीय टेबलटेनिस संघाचे नेतृत्व करणार आहेत. भारतीय टेबलटेनिस महासंघाने दि. १७ मे रोजी तशी घोषणाही केली आहे. पुरुष संघात शरत कमल, हरमीत देसाई, आणि मानव ठक्कर, तर महिलांच्या संघात मोनिका बात्रा, श्रीजा अकुला, आणि अर्चना कामथ यांचा सहभाग असेल. पॅरिसला जाणार्या संघाबरोबर पुरुषांसाठी जी. साथियान हा राखीव खेळाडू म्हणून जाईल, तर अयहिका मुखर्जी ही महिला राखीव खेळाडू म्हणून जाईल. भारतीय टेबलटेनिसपटू तेथे एकल आणि सांघिक विभागात खेळतील. पुरुष एकल वर्गात शरत कमल आणि हरमीत देसाई, तर महिला एकल वर्गात मोनिका बात्रा आणि श्रीजा अकुला आपल्याकडून आव्हान देतील. मार्च २०२४ मध्ये घोषित झालेल्या, जागतिक क्रमवारीला अनुसरून ही निवड करण्यात आली आहे. ४१ वर्षांचा असलेल्या ’शरत कमल’चे हे पहिले - दुसरे नव्हे, तर पाचवे आणि बहुदा शेवटचे ऑलिम्पिक असेल. पॅरिस ऑलिम्पिकला जाणार्या भारतीय संघातील ’शरत कमल’ हा वयाने सर्वांत मोठा आणि अनुभवी ऑलिम्पिकपटू असेल. त्या संघातील ’मोनिका बात्रा’चे हे लागोपाठ तिसरे ऑलिम्पिक असेल. मोनिका बात्रा हिने सर्वोत्तम कामगिरी करत जागतिक क्रमावारीत २४ व्या क्रमांकावर मजल मारली आहे. अशी कामगिरी करणारी, मोनिका बात्रा ही पहिली भारतीय महिला टेबलटेनिसपटू ठरली आहे. यांच्याबरोबरचे राखीव खेळाडू जरी ऑलिम्पिकसाठी पॅरिसला भारतीय चमूसमवेत जाणार असले, तरी ते मुख्य खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडाग्रामात निवास करणार नाहीत; कारण तसे नियम असतात. यासाठी ‘भारतीय ऑलिम्पिक समिती’ मुख्य खेळाडूंच्या आजूबाजूच्या परिसरात अपार्टमेंट बुक करत असतात. मुख्य खेळाडूंमधील जर कोणी आजारी पडला, दुखापतग्रस्त झाला, तर त्याच्या जागेवर हे राखीव खेळाडू देशाकडून त्या स्पर्धेत सहजी उतरू शकतात. जी. साथियान आणि अयहिका मुखर्जी हे २०१८ व २०२२च्या आशियाई खेळांमध्ये भारतीय टेबलटेनिस संघात खेळले होते. त्यांना जरी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असला, तरी जागतिक क्रमवारीला अनुसरून मुख्य खेळाडू म्हणून निवड करण्यात येत असल्याने ते राखीव म्हणून असतील.
एकदम अल्टिमेटच
क्रिकेटच्या आयपीएलसारख्या मोठ्या प्रोफेशनल लीग चालू असल्याचे आपण आज बघत आहोत. हॉकी प्रो लीगच्या स्पर्धेत उतरलेल्या कप्तान टेटेचा लीगच्या संदर्भातील उल्लेख आपण लेखाच्या प्रारंभी पाहिला. आपल्या या लेखाचा मुख्य मुद्दा असलेल्या टेटेचीदेखील एक लीग पुण्यातील ’बालेवाडी क्रीडासंकुल’ात गतवर्षी होऊन गेली आहे. २०१७ मध्ये सुरू झालेल्या ’अल्टिमेट टेबलटेनिस लीग’ने टेबलटेनिसचा खेळ जनमानसांत आवडीचा म्हणून अधिकाधिक वाढविण्यात मोलाचा ठरला. टेटे खेळणार्या मुला-मुलींचे प्रमाण वाढल्याने, ते आता सगळ्यांना सांगत आहेत की, ‘टेटेचा खेळ एकदम अल्टिमेटच असतो बरे का!’ आता ’पॅरिस ऑलिम्पिक’ स्पर्धेत भारतीय टेबलटेनिसपटूंपैकी एखाद्याने किमान एक तरी पदक जिंकावे, म्हणजे मग समस्त भारतीय क्रीडाप्रेमी उत्स्फूर्तपणे एकमुखाने म्हणतील, ‘टेटे एक नंबर... टेटे एकदम अल्टिमेट’. पिंगपाँगचा भारतीय ‘टकटक’ असा आवाज टेबलोटेबली ऐकविणारे अजून काही शरत आणि मोनिका घडो अशी आपण मनोकामना व्यक्त करू. मराठी टेटेपटूंचाही टकटकचा आवाज आम्हाला आयफेल टॉवरजवळ ऐकणे शक्य झाले नाही, तरी नंतरच्या लॉसएन्जल्सच्या अमेरिकी टेबलांवरून तरी तो ऐकायला मिळो, अशी स्वदेशी व मराठीमोळी मागणी करत आपण पॅरिसमधील निकालाची वाट बघत थांबत या लेखात ‘इति’ म्हणण्याअगोदर, या लेखाच्याच निमित्ताने, आपले क्रीडापटू पॅरिसच्या ज्या शहरी जात आहेत, तो किनारा आणि त्रिखंडात गाजलेली ती उडी फ्रांसच्या ज्या किनार्यावर आहे, ते मार्सेलिसचे बंदर ही ठिकाणे एकमेकांच्या बर्याच जवळच्या अंतरावर आहेत. ही आठवणही मला याप्रसंगी येते. दि. २८ मे व दि. २९ मे रोजीच्या वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी या तिथीनुसार असलेल्या हिंदू संघटक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सारे भारतीय क्रीडाप्रेमी त्यांना आजच नमन करत गर्जूया भारत माता की जय! इति!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
९४२२०३१७०४