मंटो....कधीही न उतरणारं गारूड!

    19-Jul-2025
Total Views | 11

आपल्या लेखणीतून ज्वलंत सामाजिक वास्तव मांडणार्या प्रख्यात उर्दू लेखक, कथाकार सआदत हसन मंटोंच्या पदरी पाकिस्तानमध्ये उपेक्षाच आली. मात्र, मृत्यूनंतर ७० वर्षांनंतरही त्यांच्या लेखणीचे गारुड आजही कायम आहे..

ता फाळणीपूर्वी लिहिलेल्या साहित्याचीही वाटणी होणार का?” फाळणीनंतर मंटोने हा प्रश्न त्या काळच्या अनेक साहित्यिकांना विचारला. त्यावर ते निरुत्तर झाले होते. मंटो फळणीच्या अगदी विरुद्ध होता. मुळात धर्माने दोन माणसांमध्ये दरी निर्माण व्हावी, हे त्याला पटलं नाही कधीच! मंटोचा जन्म फाळणीपूर्वीच्या पंजाबमधला. वडिलांचा स्वभाव अतिशय कडक आणि मंटो खूप मस्तीखोर. ज्यामुळे त्याचा स्वभाव बंडखोर बनला. त्यांनी ठरवलं की आपलं जीवन आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहून जगायचं. अभ्यासात त्याचं फार लक्ष नसे.

जगात अजरामर साहित्य लिहिणार्या या अवलियाला बोर्डाची म्हणजे शालेय परीक्षा उत्तीर्ण व्हायला तीन वर्षे लागली. ज्या उर्दू भाषेत त्याने एक कादंबरी, २२ लघुकथा संग्रह, पाच रेडिओ मालिका, तीन निबंध संग्रह अनेक पटकथा एवढी महान साहित्यनिर्मिती केली, त्या मंटोला उर्दू विषयात सर्वांत कमी गुण मिळावेत? १९३३ साली वयाच्या २१व्या वर्षी मंटोची भेट अब्दुल बारी अलिग या वादग्रस्त लेखकाशी झाली. तिथून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनी मंटोला रशियन आणि फ्रेंच लेखकांचं साहित्य वाचावं, असं सूचवलं. मंटोने त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १९३४ मध्ये विटर हयुगो आणि ऑस्कर वाईल्ड यांच्या पुस्तकांचे उर्दू भाषेत अनुवाद केले.

खूप लहान वयात मंटो लिहू लागला होता. ‘तमाशा’ ही जालियनवाला बाग हत्याकांडावरून सूचलेली पहिली कथा. एका छोट्या शाळकरी मुलाला आकाशातून घिरट्या घालणार्या विमानाबद्दल जवळपास होणार्या गोळीबाराच्या आवाजामुळे अनेक बालसुलभ प्रश्न पडतात. ते वाचून आपल्याही मनात कालवाकालव होते.

मंटोने त्याच्या साहित्यातून अनेक वेश्यांशी आपली गाठ घालून दिली. ‘दस रुपये’ या कथेतली नायिका सरिता जेमतेम १५ वर्षांची. तिची आई तिला तयार करून दलालासोबत धंदा करण्यासाठी पाठवते खरी, पण त्या तीन तरुण पुरुषांबरोबर अल्लड सरिता गाडीत बसून, गाणी गात, मोकळ्या हवेत फिरून, त्या तिघांना मजेत दारू पाजून परत येते. तेही रमतात. गाडीतून उतरताना त्यांनी दिलेली दहाची नोट परत करत सरिता म्हणते, "यह लो आपके दस रुपये| मैंने तो कुछ किया ही नही इसलिए लौटा रही हूँ|” शेवटचं वाय वाचताना आपल्या आत कुठेतरी गलबलतं. ‘सौ कॅन्डल पावर का बल्ब’मधील नायिका जेव्हा दलालाबरोबर मुंबई शहरात येते, दिवसरात्र धंदा करायला लागतोय, झोपच मिळत नाही, म्हणून सलग तीन रात्री जागल्यानंतर त्या दलालाच्या डोयात दगड घालते आणि मग शेजारीच गाढ झोपते. ‘हारता चला गया’मध्ये कथेचा नायक खिडकीतला दिवा लावून धंदा करायला बसलेल्या अर्ध्या वयाच्या बाईला म्हणतो, "मी तुला रोज पैसे देईन. उद्यापासून हा दिवा बंद असला पाहिजे.” त्याच वाटेने दुसर्या दिवशी जाताना पेटता दिवा आणि खिडकीतली बाई बघून तो रागाने विचारतो, "काल काय सांगितलं होतं?” ती खोचक हसून फक्त एक वाय उच्चारते, "या गल्लीतले सगळे दिवे बंद करणार असशील, तर ऐकेन तुझं!” ‘हतक’मधली सुगंधी असेल, ‘खोल दो’मधली सकीना, ‘लायसन्स’मधली निक्की या सगळ्या वासनेची शिकार झाल्या आहेत.

‘आंखे’मधली हनीफा, ‘महमूदा’मधली नायिका या मंटोच्या कथांमधल्या नायिका परिस्थितीपुढे हतबल आहेत. यावरचं मंटोचं भाष्य आपल्याला वेश्येकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देतं. तो म्हणतो, "प्रत्येक बाई वेश्या नसते, पण प्रत्येक वेश्या ही बाई असते, हे कायम लक्षात ठेवायला हवं.” महत्त्वाचं म्हणजे, मंटोने यातली एकही कथा मनाने रचलेली नाही. या सार्याचजणी त्याला भेटल्या आहेत, त्यांनी मनाच्या तळाशी कोंडून ठेवलेली दुःखं त्याच्यापाशी उलगडली आणि मंटोने ती अतीव संवेदनशीलतेने आपल्यापर्यंत पोहोचवली.

मंटोच्या साहित्यात आपल्याला अनेक व्यक्तिचित्रणेदेखील रेखाटलेली दिसतात. फोभाबाई, मम्मदभाई, ‘काली सलवार’मधला शंकर, ‘आखरी सल्युट’मधले राम सिंग, रब नवाज, ‘कुत्ते की दुआ’मधला शेख साहब, खुशिया, ‘शरीफन’मधला कासिम, ‘ठंडा गोश्त’मधला ईश्वर सिंह असे अनेक. वाचताना रंग-रूपासह प्रत्येक व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर साक्षात उभी राहाते, हे आवर्जून सांगायला हवं.

फाळणीच्या काळातील घटना, माणसांच्या कत्तली हे पाहताना मंटोचे मन व्यथित होत होते. हजारो हिंदू आणि मुस्लिमांच्या हत्येविषयी मंटो लिहितो, "असे म्हणू नका की, एक लाख हिंदू किंवा एक लाख मुस्लिमांची कत्तल झाली आहे; तर म्हणा की दोन लाख माणसे मारली गेली आहेत.” फाळणीच्या पार्श्वभूमीवर मंटोने ‘स्याह हाशिए’ या नावाने दोन वायांपासून ते दहा पानांइतया लांबीच्या कथा लिहिल्या आहेत. काही उदाहरणं द्यायची झाली तर...

तोट्याचा व्यवहार : दोन मित्रांनी दहा-वीस मुलींमधली एक मुलगी निवडली. ४२ रुपये देऊन तिला विकत घेतले. रात्र घालवल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने मुलीला तिचे नाव विचारले. तिने सांगितलेले नाव ऐकून तो चिडला. "आम्हाला तर सांगितलं होतं की तू दुसर्या धर्माची आहेस.” "ते खोटं बोलले होते,” मुलीनं उत्तर दिलं. हे ऐकून तो घाईघाईने मित्राकडे गेला आणि म्हणू लागला, "त्या हरामखोराने आपल्याला धोका दिलाय. आपल्याच धर्माची मुलगी आपल्याला विकली आहे. चल परत करून येऊ.”

सवलत : माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलीला मारू नका. ठीक आहे. तुझं म्हणणं मान्य. तिचे कपडे काढून घेऊन तिला सोडून द्या.

खबरदार : बंडखोरांनी घरच्या मालकाला खेचून घराबाहेर ढकलून दिले. कपडे झटकून उठत तो बंडखोरांना म्हणू लागला, "पाहिजे तर मला मारून टाका, पण खबरदार माझ्या रुपया पैशांना हात लावाल तर!”

माणसातल्या क्रूर स्वभावाचे, लोभीपणाचे, अनैतिकतेचे, धर्मांधतेचे अनेक आरसे मंटो त्याच्या लेखणीतून समाजाला दाखवत राहिला. या सगळ्या प्रसंगांचा, घटनांचा, माणसांचा विचार करताना मंटोच्या भावनाप्रधान, संवेदनशील मनावर आघात होत होते. एकदा नाही, तर दोनवेळा त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल होऊन उपचार करून घ्यावे लागले होते.

"नेते जेव्हा भावूक होऊन रडण्याचा आव आणत लोकांना सांगतात की, धर्म संकटात आहे, तेव्हा ते अजिबात खरं मानू नये. धर्म ही इतकी सोपी, इतकी छोटी गोष्ट नाही, जिला सहज धोका पोहोचेल. मात्र, आपला स्वार्थ साधण्यासाठी जे नेते खोटं सांगत आहेत, ते धर्मासाठी धोकादायक आहेत.”

हे मंटोने लिहिलेलं सडेतोड वाय दुर्दैवाने आजही खरं आहे. अशा रोखठोक विचार व्यक्त करण्याच्या मंटोच्या वृत्तीमुळे तो अनेकदा अडचणीत सापडला होता. जळजळीत वास्तव तितयाच थेट शब्दांत मांडणार्या मंटोवर पाकिस्तानात खटले भरले गेले. १९४२ मध्ये ‘काली सलवार’ या काठामुळे मंटोवर खटला भरण्यात आला. ‘बू’, ‘धुआं’, ‘ठंडा गोष्त’, ‘उपर नीचे और दरमियान’ या कथांमुळे पाकिस्तान सरकारने मंटोवर खटले भरले होते. या कथा अश्लील, समाजविघातक आहेत, असं म्हणत मंटोच्या साहित्यावरही पाकिस्तानमध्ये काही काळ बंदीही घालण्यात आली होती. यावर मंटोचं म्हणणं "जर तुम्हाला माझ्या कथा असह्य वाटत असतील, तर याचा अर्थ असा की, आपण एका असह्य युगात जगत आहोत.”

फाळणीनंतर नाइलाजाने १९४८ साली जेव्हा मंटो पाकिस्तानात निघून गेला, तेव्हा "मी कोणत्या देशाचा नागरिक आहे, हे मला ठरवता येत नाही,” असं खेदाने म्हणाला होता. आपल्या मरणानंतर कबरीवर लिहिण्यासाठी मंटोने आधीच मजकूर देऊन ठेवला होता.

"इथे सआदत हसन मंटो झोपला आहे आणि त्याच्याबरोबर त्याची कथालेखनाची कला आणि गुपितंदेखील पुरली गेली आहेत. मणभर मातीच्या ढिगार्याखाली गाडला गेलेला मी विचार करत आहे की मी स्वतःपेक्षा महान कथाकार आहे का?”

वास्तवाची जाणीव करून देणारं, मानवतेला साद घालणारं मंटोचं लेखन कालातीत आहे. त्याला या लेखाद्वारे सादर अभिवादन.

धनश्री करमरकर
९८२११६३०७७

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121