
बुधवार, दि. १६ जुलै रोजी पहाटे ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संपादक आणि ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’चे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते. (जन्म - ६ नोव्हेंबर, १९५२) पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्र यांमधील त्यांची पाच दशकांची कामगिरी अजोड म्हणता येईल, अशी आहे. नवे विचार, नवे दृष्टिकोन हे सर्वांना सोबत घेऊन रुजवणारे डॉ. टिळक हे खर्या अर्थाने विद्या, विवेक आणि व्यासंगाचे व्यासपीठ होते. त्यांच्या जीवनप्रवासावरचा हा एक दृष्टिक्षेप...थोर व्यक्तीच्या घराण्यात जन्माला येणे, हे कितीही गौरवशाली असले, तरी त्याबरोबर येणारी जबाबदारी आणि समाजाची वाढलेली अपेक्षा पूर्ण करणे, हे कायमच आव्हानात्मक असते. डॉ. दीपक टिळक यांच्यासमोरही हे आव्हान होते आणि ते केवळ लोकमान्यांचेच नव्हते, तर पुढच्या प्रत्येक पिढीतील व्यक्तींनी आपली समाजधार्जिणी वृत्ती दाखवली होती. लोकमान्यांचे चिरंजीव आणि डॉ. दीपक टिळक यांचे आजोबा श्रीधर टिळक यांनी सत्यशोधक समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काम केले होते. आजी शांताबाई यांनी तर अनाथ हिंदू महिलाश्रम हेच आपले जीवितकार्य मानले होते.
वडील जयंतराव आणि आई इंदुताई यांनी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मानदंड उभे केलेले आपल्याला ठावूक आहे. हे संस्काराचे संचित ही मोठी पुंजी डॉ. दीपक टिळक यांनी अभिमानाने जपली आणि आपल्या कृतीतून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. घरातून मिळालेलं स्वातंत्र्य हे व्यावसायिक आणि सामाजिक जडणघडणीत डॉ. टिळक यांना उपयोगी पडले असणार. त्यामुळे वयाची २४ वर्षे पूर्ण होताच ‘केसरी’ परिवारात ते सामील झाले आणि अनुभवाची शिदोरी एकेका कामातून मिळवते झाले. मालक म्हणून नव्हे, तर एक सर्वसाधारण काम करणारी व्यक्ती म्हणूनच कामाची सुरुवात करताना आपण कोणी मोठ्या घराण्यातले व्यक्ती आहोत, हा अहंगड त्यांनी कधीच दाखवला नाही. किंबहुना, ‘इतरांमधील एक’ ही ओळख त्यांच्यात समानता आणि लोकशाही मूल्यांची पेरणी करून गेली.
आजच्या काळात बोलघेवड्या माणसांची चलती दिसते. कारण, जाहिरातबाजी आणि प्रसिद्धीचे साधन म्हणून वाणीचा उपयोग करणार्यांचा हा जमाना आहे. सतत शब्द पेरत, वायांची आतषबाजी करत समाज वाटचाल करत असताना डॉ. दीपक टिळक यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व या पार्श्वभूमीवर उठून दिसले. ते अतिशय कमी बोलत, पण नेमके बोलत. कमी शब्दांत जास्त आशय सांगण्यासाठी एक चिंतनशील, विवेकी दृष्टी लागते, ती त्यांच्यापाशी होती. त्यामुळे अगदी १०-१५ मिनिटे त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला, तरी खूप काही मिळाल्याचे समाधान लाभायचे. व्यक्तिमत्त्वाची ही अशी जडणघडण होण्यासाठी कारणीभूत असते, ती म्हणजे ठोस वैचारिक बैठक आणि घटनांकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची वृत्ती. यामुळे बर्याच वेळा असे व्हायचे की, एखादा माणूस त्यांच्याकडे काही प्रश्न वा समस्या घेऊन गेला की काही वेळातच त्याला आपली त्यातील भूमिका आणि जबाबदारी काय आहे, हे स्पष्ट होत असे. ती व्यक्ती चुकली असेल, तर तेही टिळक सर स्पष्टपणे सांगत. पण, केवळ दोष न सांगता, त्यावरील उपाय आणि अपेक्षित कृती यांचे दिशादर्शन समोरच्याला होत असे. झालेली चूक पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घेणार्यांना टिळक सरांकडून कायमच मदतीचा हात मिळायचा.
मध्यंतरी एका कार्यक्रमात त्यांची मुलाखत मी घेतली होती. त्यावेळी ते आपल्या पत्रकरितेच्या कारकिर्दीबद्दल खुलून बोलले. ‘हॅण्ड कंपोज’पासून ते आजच्या संगणकप्रणित छपाई प्रक्रियेचे सक्रिय साक्षीदार असलेले डॉ. टिळक यांनी ‘केसरी’ वृत्तपत्राच्या वाटचालीत मोलाची कामगिरी बजावली आहे. व्यवस्थापनशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहेच, पण नफा-व्यवसाय-विक्री यांपेक्षाही पत्रकारितेवर त्यांचे काकणभर जास्त प्रेम आहे, हे त्यांच्या कथनातून जाणवले होते.
१९७०च्या दशकातील पत्रकारितेसमोरील आव्हाने सांगताना बातमीदारी त्यावेळी किती अवघड होती, याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. बेळगावची ‘हिंद केसरी’ कुस्ती स्पर्धेचे छायाचित्र पुण्यापर्यंत कसे प्रवास करत आले, हे ऐकणे ही एक मेजवानीच होती. आपल्याकडील परदेशी बनावटीच्या रेडिओवर त्यांना पोलीस विभागाचा बिनतारी संदेश योगायोगाने ऐकता आला आणि जोशी अभ्यंकर हत्याकांडातील आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी हे खात्रीलायक वृत्त त्यांना मिळाले आणि दुसर्या दिवशीच्या ‘केसरी’मध्येच केवळ ही एसक्लुजिव्ह बातमी वाचकांना मिळाली.
ग्रामीण पत्रकारिता, टीव्हीवरील ‘ब्रेकिंग न्यूज’चा मारा याबद्दलही ते बोलले. यातून सतत हे जाणवत होते की, विकासात्मक पत्रकारिता यावर त्यांचा भर आहे. वाचकांचा विश्वास हीच वृत्तपत्रांची मोठी शक्ती असते, ही त्यांची विचारधारा आजच्या गळेकापू स्पर्धेच्या काळात सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरावी.
लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना अभिमान होताच, पण त्याहीपलीकडे जाऊन त्यांच्या कामाविषयी, लोकमान्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी त्यांचा व्यासंग अफाट म्हणावा असाच होता. मध्यंतरी एकदा मी माझ्या लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांवर एक संशोधनपर लेख लिहिला होता. तेव्हा काही मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने त्या अग्रलेखांचे विश्लेषण केले होते, ते ऐकून त्यांच्या ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या वृत्तीची जाणीव मला झाली. लोकमान्यांचे चरित्र अनेक ज्येष्ठ मंडळींनी लिहिले आहे. अगदी न. चिं. केळकरांपासून ते धनंजय कीर यांच्यापर्यंत. ग. प्र. प्रधान आणि ए. के. भागवत यांनीही लोकमान्यांच्या आयुष्याचा उत्तम वेध घेतला आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी तर रसाळ भाषेत लोकमान्य आपल्या समोर उभे केले आहेत. तरीही डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी जे लिहिले आहे, त्याविषयी आवर्जून सांगण्यासारखे आहे. ते म्हणजे त्यांनी लोकमान्यांच्या कार्याचा अतिशय अभ्यासपूर्ण आणि साकल्याने वेध घेतला आहे.
हा वेध एक संशोधकाच्या दृष्टीतून घेतला आहे.लोकमान्यांचे विचार, त्यांच्या सुधारणांच्या संकल्पना, त्यांचे कामगार चळवळ ते ग्रामीण अर्थव्यवस्था याबद्दलचे चिंतन याचे परिशीलन डॉ. टिळक यांनी अतिशय सोप्या भाषेत केले आहे. आजच्या पिढीला लोकमान्य समजावून घ्यायचे असतील, तर त्यांनी डॉ. टिळक यांनी लिहिलेले ग्रंथ जरुर वाचले पाहिजेत.
‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’च्या कुलगुरूपदी १५ वर्षे त्यांनी काम केले. तो कालखंड विद्यापीठाच्या समोरील आव्हांनांचा होता.अनेक मोठ्या आर्थिकदृष्ट्या तगड्या शिक्षण संस्था समोर स्पर्धेत होत्या. पण, डॉ. दीपक टिळक यांच्या शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट होत्या.
८०-८५ वर्षांची परंपरा असलेल्या विद्यापीठाची धुरा हातात घेताना स्वावलंबन-ज्ञानप्राप्ती आणि राष्ट्रीय जाणिवा यांवर भर देत त्यांनी बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक गरजांचा विचार करत अभ्यासक्रमांमध्ये बदल केले.
काही विषय, विभाग नव्याने सामील करून घेतले. त्यामुळे ‘भारतविद्या’ (इंडोलॉजी) पासून ते हॉटेल व्यवस्थापन, जपानी भाषा, आयुर्वेदापासून ते अॅनिमेशनपर्यंतचे अनेक अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू आहेत. कौशल्य विकास यांवर सरांचा विशेष भर असल्यामुळे हा स्वतंत्र विभाग ही या विद्यापीठाची एक वेगळी ओळख ठरली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाबाबतही त्यांचे मार्गदर्शन विद्यापीठाला लाभले. कृत्रिम बुद्धिमत्ता हा ऐरणीवर आलेला विषय येत्या काळात महत्त्वाचा ठरणार, हे जाणून त्यांनी विद्यापीठात यासंबंधीची प्रयोगशाळाही तातडीने उभारली. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते ज्युदोपटू असलेल्या डॉ. टिळक यांनी विद्यापीठात क्रीडासंस्कृती कशी वाढेल, याकडेही विशेष लक्ष दिले.
‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ आणि ‘केसरी’ वृत्तपत्र यांमध्ये भरीव योगदान देताना ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक’ (‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करणारी संस्था), ‘रोझ सोसायटी’, ‘अनाथ हिंदू महिलाश्रम’ अशा अनेक संस्थांच्या कामातही त्यांचे लक्षणीय योगदान आहे. ‘वसंत व्याख्यानमाला’ हा ज्ञानयज्ञ गेली १५० वर्षे अव्याहत सुरू आहे; त्याचे बरेचसे श्रेय त्यांना जाते.
समाजातील बदल सहज टिपणारे आणि एकूणच समाज, संस्था, संस्कृती, शिक्षण यांच्या वाटचालीबद्दल सजग असलेले डॉ. दीपक टिळक एक अभ्यासू आणि उमदे व्यक्तिमत्त्व आपला न पुसता येणारा ठसा उमटवून आपल्यातून निघून गेले आहे. त्यांनी घालून दिलेली शिस्त आणि त्यांनी केलेले संस्कार हे मोठे संचित ‘केसरी’ वृत्तपत्र आणि ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ या दोन्ही संस्थांकडे आहे. हा अनमोल ठेवा जपणे आणि वर्धिष्णू करणे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
डॉ. केशव साठये
९८२२१०८३१४