कानपूर कार अपघात; दीड वर्षांत चक्क १६ चालान...तपासात धक्कादायक माहिती उघड
22-May-2024
Total Views | 38
लखनऊ : उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एका नियंत्रण सुटलेल्या मारुती इको कारने ५ महिलांना चिरडले आहे. या अपघातात आतापर्यंत ४ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक महिला जखमी झाली आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे पूनम पांडे, दिव्या पांडे, सरिता द्विवेदी व ज्योती अशी आहेत.
अपघातदरम्यान कारचा वेग तब्बल १०० किमी प्रतितास इतका होता. सदर कारचा मालक मोहम्मद अहमद असून त्याने मागील दीड वर्षांत १६ चालान कापले आहे. मोहम्मद हा कानपूर येथील रहिवासी आहे. सदर वाहन २०२२ मध्ये व्यावसायिक कारणांसाठी खरेदी करण्यात आले होते. त्याचबरोबर, दीड वर्षांच्या कालावधीत या वाहनासाठी वेगवेगळ्या १६ प्रसंगी चलन बजावण्यात आले आहे. यातील बहुतांश चलन हे बेकायदा पार्किंगसाठी बजावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर जिल्ह्यातील महाराजपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. मंगळवारी सायंकाळी ५० वर्षीय पूनम पांडे आपली मुलगी दिव्या आणि सरिता द्विवेदी, ज्योती आणि अपर्णा यांच्यासोबत हातीपूर फ्लायओव्हर ओलांडत होत्या. सर्व महिला एकाच कुटुंबातील असून त्यांना फतेहपूर महामार्गावरून भरधाव वेगात कारने उडविले. घटनेच्या वेळी कारचा वेग १००च्या आसपास होता.
रस्ता ओलांडणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ महिलांना चिरडल्यानंतर कार चालविणारा चालक कार सोडून पळून गेला. अपघातानंतर एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दुर्घटनेनंतर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. मोहम्मद अहमद हा कानपूरचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.