रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरण! NIAने सॉफ्टवेअर इंजिनीअर 'सोहेल'ला घेतले ताब्यात
22-May-2024
Total Views | 43
बंगळुरु : रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी NIA (National Investigation Agency) सातत्याने छापे टाकत आहे. एनआयएने मंगळवार, दि. २१ मे २०२४ दक्षिण भारतातील ११ ठिकाणी छापे टाकले. दि. १ मार्च २०२४ रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये १० लोक जखमी झाले होते. या स्फोटाशी संबंधित मुख्य दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
एनआयए या प्रकरणातील सर्व तार जोडत असून दहशतवाद्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी छापे टाकत आहे. एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. एनआयएने बेंगळुरूमधील कुमारस्वारी लेआउट आणि बनशंकरी येथेही छापे टाकले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरम कॅफे स्फोटातील मुख्य दहशतवादी मुसावीर हुसेन शाजिब आणि अब्दुल मतीन ताहा यांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला, ज्यांनी स्फोटाची योजना आखली होती.
वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रायदुर्गम शहरातील निवृत्त मुख्याध्यापक अब्दुल यांच्या घरावरही एनआयएच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात मुख्याध्यापक अब्दुल आणि त्यांचा मुलगा सोहेल यांची त्यांच्या बँक खात्यांबाबत चौकशी करण्यात आली. दोघांच्या खात्यात भरपूर पैसे सापडले आहेत. सोहेल बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतो. या चौकशीनंतर एनआयएने सोहेलला ताब्यात घेतले असून त्याची रायदुर्गा पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
रिपोर्टनुसार, सोहेल बराच काळ एनआयएच्या रडारखाली होता आणि त्याचे अब्दुल मतीनशी संबंध होते. अब्दुल मतीन हा रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. एनआयएने पश्चिम बंगालमधून मुख्य दहशतवादी अतिन अहमद ताहा आणि बॉम्ब प्लांटर मुसावीर हुसैन शाजिब यांना अटक केली, जिथे दोघेही बनावट नावे आणि ओळखीसह लपून राहत होते. दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी बेंगळुरू येथे झालेल्या स्फोटातही शरीबचा सहभाग होता.
एनआयएकडून ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, यामध्ये तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील दोन डॉक्टरच्या ठिकाणांचाही समावेश आहे. वृत्तानुसार, एनआयएने कोईम्बतूरमधील पेरिया सुब्बन्ना गौंडर स्ट्रीट आणि साईबाबा कॉलनीतील नारायण गुरु रोड येथे छापे टाकले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही डॉक्टर कर्नाटकचे रहिवासी आहेत आणि कोईम्बतूरच्या साईबाबा कॉलनीमध्ये असलेल्या एका खासगी रुग्णालयात २ वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहेत. एनआयएने मंगळवारी सकाळी आठ वाजता छापेमारी सुरू केली.