मुंबई, दि.१ : भारतीय रेल्वेच्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे जाळे विस्तारण्याची तयारी जोरात सुरू आहे. याच क्रमात नुकताच 'वंदे भारत मेट्रो'ची पहिली ट्रेन मुंबईच्या दिशेने येण्यासाठी तयार असल्याची पहिली झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला असून ही ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी तयार असल्याचे दिसून येते आहे. या व्हिडिओला युजर्सनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
इंटिग्रल कोच फॅक्टरी, कपुर्थळा येथे वंदे भारत मेट्रोचे कोच तयार केले जात आहे. नवीन केशरी आणि तपकिरी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन इंटीग्रल कोच फॅक्टरी ते पाडी रेल्वे फ्लायओव्हर या ट्रॅकवर चालवण्यात आली आणि चाचणी घेण्यात आली. ही चाचणी १९ ऑगस्ट २०२३ रोजी झाली. वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि मेट्रो ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मध्ये सुरू होणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्लीपर ट्रेनचा लाभ मिळणार आहे. तर 'वंदे मेट्रो' १०० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शहरांमध्ये चालवली जाईल. 'वंदे भारत मेट्रो' यावर्षी ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लवकरच ते प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
सोशलमिडीयावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ काही वेळातच युजर्सच्या पसंतीस उतरला. मुंबईकर या ट्रेनच्या लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका यूजरने लिहिले - 'वंदे भारत मेट्रो'मुळे सामान्य गाड्यांवरील प्रवाशांचा ताण कमी होईल. तर काही युजर्सनी लिहिले आहे की, ही ट्रेन शहरांना जोडेल. ती सामान्य मेट्रोप्रमाणे शहरांमध्ये धावणार नाही. दुसऱ्या यूजरने लिहिले - शेवटी, वंदे मेट्रो रुळावर आली. हा एक उत्तम अनुभव आहे.