“...नाहीतर आम्ही कलाकार उपोषणाला बसू”, प्रशांत दामलेंचा इशारा

    17-May-2024
Total Views | 935
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी १०० वर्ष जुन्या दामोदर नाट्यगृहाला वाचवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.
 

prahsant damle 
 
मुंबई : परळमधील सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह १ नोव्हेंबर २०२३ पासून पुनर्बांधणीच्या कामासाठी बंद आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव असल्यामुळे याविरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी पसरली असून कलाकारांनी दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील १०० वर्षांचा अलौकिक इतिहास असलेल्या दामोदर नाट्यगृहाला वाचवण्यासाठी अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे.
 
प्रशांत दामले यांनी या विषयासाठी विशेष पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात ते म्हणाले की, “दामोदर हॉलच्या बाबतीत ज्या गोष्टी सामोपचाराने व्हाव्या असे वाटत होते त्या झाल्या नसल्याने ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. मूळात दामोदर हॉल हे नाट्यगृह पुन्हा उभे राहील की नाही? याबाबतच साशंक असल्याने नाट्य परिषदेचे विश्वस्त मंत्री उदय सामंत यांना आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घालून देण्याची विनंती केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्यांची भेट घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी एकदाच चर्चा करून हा विषय संपवावा. दामोदर हॉलमधील कर्मचाऱ्यांना संस्थेच्या इतर कामांमध्ये सामावून घेणे गरजेचे आहे".
 
पुढे ते म्हणाले की, "यासाठी सोशल सर्व्हिस लीग, दामोदर हॉलचे व्यवस्थापन, सहकारी मनोरंजन मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची एकत्र बैठक घेण्यात यावी. त्यातूनही तोडगा निघाला नाही तर मी सर्व कलाकारांना घेऊन उपोषणाला बसेन असा शब्द नाट्य परिषदेतर्फे देत असल्याचे म्हणत दामले यांनी सरकारला थेट ईशारा दिला आहे. यासाठी दामलेंनी सरकारला २८ मेपर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर रंगकर्मींतर्फे उपोषणाचे हत्यार उपसले जाईल. नीलम शिर्के-सामंत यांनी दामलेंच्या वक्तव्याला दुजोरा देत अगोदर शाळा बांधून झाल्यास दामोदर हॉल पुन्हा उभा राहिल याची खात्री वाटत नसल्याचे म्हटले. दामोदर हॉलच्या या लढ्यात लोककलावंतही सामील होतील अशी खात्री मेघा घाडगेने दिली आहे".
 
कलाकारांच्या इतर महत्वाच्या मागण्या
 
- शाळा आणि नाट्यगृहाचे बांधकाम एकाच वेळी सुरू करून पूर्ण करण्याचे लेखी स्वरूपात द्यावे.
- ७५० आसनक्षमतेचे नाट्यगृह उभारले जावे. पूर्वीच्या कार्यालयांना तेवढ्याच क्षेत्रफळाची जागा नवीन वास्तूत मिळावी.
-नाट्यगृहासाठी मिळालेला वाढीव एफएसआय नाट्यगृहासाठीच वापरावा. -कर्मचाऱ्यांना पर्यायी रोजगार देऊन नंतर नाट्यगृहाच्या सेवेत सामील करावे.
-नवीन वास्तू तयार होईपर्यंत मंडळाच्या कार्यालयासाठी पर्यायी जागा द्यावी.
- शाळा व नाट्यगृहाचे प्रवेशद्वार वेगवेगळे असावे.
-नाट्यगृह तळमजल्यावर बांधावे व भाडे मर्यादित ठेवावे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121