माझ्यासाठी ही निवडणूक सोपी नाही! मुनगंटीवारांना दांडगा अनुभव : प्रतिभा धानोरकर

    25-Mar-2024
Total Views | 71

Pratibha Dhanorkar 
 
नागपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नाही, असे मत प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसने दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे.
 
सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, "सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मुरब्बी राजकारण केलं आहे. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी राहणार आहे."
 
"महाविकास आघाडीतील सगळे घटकपक्ष आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आहे. हा गड मी नक्की सर करेन असा मला विश्वास आहे. मला उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. ही माझी वैयक्तिक लढाई नाही. तर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे," असे त्या म्हणाल्या.
 
चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी रस्सीखेच सुरु होती. याविषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, "आमचा पक्ष हा ध्येय धोरणावर चालणारा आहे. त्यामुळे मला उमेदवारी मिळाल्यावर विजय वडेट्टीवार पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश मानतील. तळागळातील सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही ही लढाई लढणार आहोत. येत्या २७ तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून पक्षश्रेष्ठी म्हणून जिल्ह्यातील आजी माजी मंत्री, आमदार, खासदार या सर्वांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. यावेळ विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवारांनादेखील मी आमंत्रित करणार आहे आणि ते तिथे येतील," असेही त्या म्हणाल्या.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121