डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हिंदुत्वाची पहिली लढाई लढली : मंत्री आशिष शेलार

    23-Jun-2025
Total Views | 13


मुंबई : आजकाल उद्धवजी जनसंघ आणि हिंदुत्वावर जास्त बोलतात. पण आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हिंदुत्वाची पहिली लढाई लढली, असे प्रतिपादन मंत्री आशिष शेलार यांनी केले.

रविवार, २२ रोजी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनाच्या पूर्वसंध्येला कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुनीलकुमार शर्मा, मंत्री आशिष शेलार, माजी आमदार सुनील राणे, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे, दीपकमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेले सैनिक मुरली नाईक यांच्या वीरमाता ज्योतीबाई नाईक यांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन प्रेरणादायी आहे. इतिहासाने आणि देशात सरकारमध्ये बसलेल्या अनेक लोकांनी बरीच वर्षे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या त्यागावर, बलिदानावर अन्याय केला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सर्वात पहिल्यांदा देव, देश आणि धर्मासाठी जगणं आणि मरण्याची शिकवण दिली. काही वेडे लोक अभ्यास करणार नाहीत आणि सत्याकडे डोळेझाक करतील. पण श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे कुणीही डोळेझाक करू शकत नाही. ते नसते तर काय झाले असते? ते नसते तर भारतात कदाचित लोकशाही मूल्यांवर चालणारी सरकारे आलीच नसती. श्यामाप्रसाद मुखर्जी नसते तर हिंदुत्वाची लढाई कोणी लढली असती, केव्हा लढली असती, उशीर झाला असता तर काय झाले असते याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते."

...तर काँग्रेसने आतापर्यंत गुडघे टेकले असते

"श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशातील निवडणुकांची निवडणूक यादी एकच असली पाहिजे असे सांगितले. निवडणूक, निवडणूक यादी यावरच्या निष्पक्षतेचा पहिला आवाज श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी उचलला. अल्पसंख्यांकांची वेगळी निवडणूक यादी देशहिताचा नाही हे त्यांनी ठणकावून सांगितले. ते नसते तर कदाचित आतापर्यंत काँग्रेसने अल्पसंख्यांकासमोर गुडघे टेकून एकाच निवडणुकीत दोन याद्या केल्या असत्या," असेही ते म्हणाले.

भोपू लिहून देतो आणि बापू बोलतो!

"आजकाल उद्धवजी जनसंघ आणि हिंदुत्वावर जास्त बोलतात. त्यांचा अभ्यास कच्चा आहे. भोपू लिहून देतो आणि बापू बोलतो. आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हिंदुत्वाची पहिली लढाई लढली," असे त्यांनी सांगितले.

"मानवतावाद, लोकशाही, न्याय, विचारांचे स्वातंत्र्य यासाठी लोक गळे काढत आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी ११ मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि २३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराने तेव्हाच्या सरकारला एकदा नाही शंभरदा विनंती केली की, त्यांना कशाची ॲलर्जी होती ते सांगा. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेसने या चौकशीचे आदेश का दिले नाही?" असा सवालही आशिष शेलार यांनी केला.

कलम ३७० ने दहशतवादाला जन्म दिला : सुनीलकुमार शर्मा

"जम्मू काश्मीरमध्ये भारतमातेची लढाई सोपी नव्हती. १५ वर्षे आम्ही ही लढाई लढलो. मी एका सैनिकाचा मुलगा असून राजकारणाशी माझा काहीही संबंध नव्हता. मी दहशवाद्यांच्या भाषेतच त्यांच्याशी लढलो. जम्मू काश्मीरमधील अनेक युवकांनी दहशतवादाला तोंड दिले. परंतू, ही लढाई अजून संपलेली नाही. ही लढाई खूप मोठी आहे. कलम ३७० ने दहशतवादाला जन्म दिला. ते सगळे आम्ही भोगले आहे. कलम ३७० वरुनच तिथल्या युवकांची माथी भडकवण्यात आली. दहशतवाद्यांना सलामी देताना आम्ही पाहिले आहे. कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या लोकांना आम्ही सॅल्युट करतो," असे सुनीलकुमार शर्मा म्हणाले.



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121