"माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही! संजय राऊत वरचेवर..."; भास्कर जाधवांचं राऊतांना उत्तर
23-Jun-2025
Total Views | 117
मुंबई : बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामधील नेते व्यासपीठावर असतानाही पक्ष मला भाषण करायला देतो. त्यामुळे माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही, असे उत्तर उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी संजय राऊतांना दिले आहे. त्यांच्या या विधानानंतर उबाठा गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"भास्कर जाधव यांनी पक्षाच्या व्यासपीठावर मन मोकळं करावं. शिवसेनेच्या वर्धापनदिनी व्यासपीठावर ज्या मोजक्या लोकांनी भाषण केलं. त्यात भास्कर जाधवसुद्धा होते. ते सातत्याने ठामपणे पक्षात आपल्या भूमिका मांडत असतात. पक्षप्रमुख त्यांच्या भावनांची दखल घेतील," असे ते म्हणाले.
यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "संजय राऊत माझे सिनियर नेते आहेत. आपल्या एखाद्या नेत्याने आपल्याबद्दल एखादं स्टेटमेंट केलं तर आपण त्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतू, अशा पद्धतीने संजय राऊत वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. मला एका गोष्टीचं भान आहे. पक्ष मला भाषण करायला देतो की, नाही ते मला चांगलं कळतं. बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामधील नेते व्यासपीठावर असतानाही पक्ष मला भाषण करायला देतो. त्याउपर आदित्य ठाकरे असतानाही पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो. त्यामुळे माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. मला भाषण करू दिलं नाही, असा जो संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा मला करायचा आहे," असे त्यांनी सांगितले.
...म्हणून मला किंमत मोजावी लागते!
ते पुढे म्हणाले की, "मला काम करण्याची संधी कमी मिळते याचा अर्थ माझ्यात दोष आहे. मी जी हुजूर करत कुणाच्या पाठीमागे फिरत नाही. मी हो ला हो म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस दाखवतो. त्यामुळे मला त्याची किंमत मोजावी लागते. पण त्यातून माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझे नुकसान होत असेल तर मला दु:ख वाटण्याचे कारण नाही," असेही भास्कर जाधव म्हणाले.