सावरकरांच्या अवमान करणाऱ्यांच्या बाजूला 'उबाठा'! शिंदे म्हणाले, "बाळासाहेबांच्या..."
16-Mar-2024
Total Views | 76
मुंबई : स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणवणारे सावरकरांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. राहूल गांधींच्या मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली. शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राहुल गांधी यांनी अनेक यात्रा काढल्या, पण पुढे काय झाले? खरंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणवणारे बसताहेत. हे दृश्य अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांना सावरकप्रेमी जनता माफ करणार नाही."
"काश्मीरी पंडितांवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना सांभाळलं होतं. त्यांचं पुर्नवसन केलं होतं. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देत त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था केली होती. पण आता उद्धव ठाकरेंनी नेमकी विरुद्ध भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत," असेही ते म्हणाले.
चार महिन्यांत 'सगेसोयरे'बाबत अंतिम अधिसूचना काढणार!
ते पुढे म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही विशेष अधिवेशन घेतले. २६ तारखेपासून प्रत्यक्ष आरक्षणाची अंमलबजावणी सुरू केली. अनेकजण आरक्षणाविरोधात हायकोर्टात गेले. पण उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आमचा निर्णय योग्य आहे. मनोज जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी स्वतंत्र कमिटी स्थापन केली. या कमिटीला मुदतवाढ दिली."
"सगेसोयरे अधिसूचनेवर ८ लाख ४७ हजार हरकती आलेल्या आहे. त्यांची छाननी सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असून दिवसरात्र आणि सुटीच्या दिवशी देखील काम सुरू आहे. त्यामुळे याविषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्हाला आणखी थोडा वेळ लागेल. अंदाजे चार महिन्यांत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. आम्ही जे-जे बोललो ते-ते केलेले आहे. त्यामुळे हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. जरांगे यांनी सरकारच्या कामावर आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे अंदाजे चार महिन्यांत हे काम पूर्ण करू," असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही सर्व ओपिनियनपोलचा सन्मान करतो. पण मागच्या दोन लोकसभा निवडणुकांपेक्षा महायुतीच्या अधिक जागा निवडून येतील. महायुतीमध्ये सन्मानजनक जागावाटप होणार असून आम्ही ८० टक्के पेपर सोडवला आहे. फक्त २० टक्के प्रश्न बाकी आहेत. तेसुद्धा आम्ही लवकरच सोडवणार आहोत. उलट पहिल्या दिवसापासून पेपर सोडवायला जे बसले आहेत, त्यांचेच प्रश्न अजून सुटत नाहीत," असेही ते म्हणाले.