मुंबई : शहापूरच्या शाळेतील कृत्य हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत या घटनेवर संताप व्यक्त केला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "शहापूरमध्ये दमानीया इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापदायक घटना घडली आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून १४ ते १५ वयोगटातील तब्बल १२ विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे."
मासिक पाळी म्हणजे गुन्हा नाही!
"मासिक पाळी आली म्हणजे काय गुन्हा नाही. पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसिमा गाठणे म्हणजे लज्जास्पद बाब आहे. घडलेली घटना केवळ अमानवी नाही, तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक अपमान आहे," आहे त्या म्हणाल्या.
शाळा म्हणजे मानसिक छळाचा अड्डा बनलाय!
"शाळा म्हणजे विश्वासाचे, संरक्षणाचे ठिकाण असायला हवे. पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती, लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनला. या घटनेबाबत संबंधित मुख्यध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे असे समजते. याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रूजवला गेला पाहिजे. तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही," असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे.