गांधीनगर : (Vadodara Bridge Collapse Update) गुजरातच्या वडोदरा आणि आणंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नदीपात्रातून ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही काहीजण बेपत्ता आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.
वडोदराचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. "आणखी 3 मृतदेह सापडले आहेत, त्यामुळे मृतांची संख्या १५ झाली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळापासून सुमारे ४ किमी खोल शोधमोहीम राबवत आहेत. अपघाताच्या वेळी, दोन वाहने पुलासोबत खाली पडली आणि आता ती चिखलात अडकली आहेत. त्या वाहनांची माहिती गोळा करण्यासाठी स्थानिक लोकांशीही संपर्क साधला जात आहे", असे धामेलिया यांनी सांगितले.
घटनास्थळी पुलावरून एक रिकामा टँकर लटकत होता. त्याच्याखालीच बचावकार्य सुरू असल्यामुळे त्याला हलवणे धोकादायक असू शकते. मदत कार्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून टँकर स्थिर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोधमोहीम आणि बचावकार्यात अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धामेलिया यांनी दिली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\