कोल्हापूर : शाहू महाराजांना निवडणूकीत उभं करणं हे शरद पवारांचंच शडयंत्र आहे. ते जूना राग काढत आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता मंडलिक यांनी भाष्य केलं. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
संजय मंडलिक म्हणाले की, "इथे दोन व्यक्तींची लढाई नाही तर दोन आघाड्या एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे कोण किती मोठं आहे आणि कोण किती लहान आहे यावर ही निवडणूक होत नाही. कोण किती विकास कामं केली आहेत आणि ती कोणामुळे रखडली आहेत, हे उमेदवार ठरवतात."
"शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत. त्याकाळात त्यांच्याविरोधात मंडलिक साहेब होते. तेवढा मोठा मी नाही. ते आले तर निश्चिचपणे त्यांचं स्वागत आहे. कारण शाहू महाराजांना निवडणूकीला उभं करण्याचं त्यांचंच षडयंत्र आहे. शाहू महाराजांची ईच्छा होती की, नाही ते मला माहिती नाही. पण पवार साहेबांना कुठला राग काढायचा असावा. त्यामुळे त्यांना रागच काढायचा असल्यास जनतासुद्धा वाट बघत आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "उद्यापर्यंत महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जागा निश्चितपणे मलाच मिळणार आहे. काल रात्रीच मला श्रीकांत शिंदेंचा फोन आला असून तुम्ही कार्यकर्ते अस्वस्थ झाला आहात का? असे त्यांनी मला विचारले. तसेच दोन दिवसांत तुमची उमेदवारी जाहीर होईल असेही ते मला म्हणाले," असे संजय मंडलिक यांनी सांगितले.