राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होताच 'या' मोठ्या नेत्यानं ठोकला पक्षाला रामराम!
13-Mar-2024
Total Views | 124
नंदुरबार : काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असताना पद्माकर वळवींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
पद्माकर वळवी हे नंदुबारचे माजी पालकमंत्री आहे. तसेच त्यांनी राज्याचे क्रीडा खातेही सांभाळले आहे. याशिवाय ते २००९ मध्ये शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडूनही आले होते. दरम्यान, आता राहूल गांधी नंदुरबारमध्ये असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत. अशातच पद्माकर वळवींच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठे खिंडार पडले आहे.
येत्या १६ मार्च रोजी राहूल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर १७ तारखेला ते शिवाजी पार्कवर भव्य सभा घेणार आहे. मात्र, राहूल गांधी महाराष्ट्रात असतानाच पद्माकर वळवींनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.