
कल्याण, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक जारी करुन सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डाॅक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शवला असून गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.
आय एम ए ने स्पष्ट केले आहे की , हे डाॅक्टर आधीच होमिओपॅथीक कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. शासनाने घेतलेला हा निर्णय ११ जुलै च्या स्वतः च्या परिपत्रकाच्या विरोधात असून या संदर्भात खटला मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काढलेले हे परिपत्रक कायद्याला धरून नसलेले व न्यायालयाचा अवमान करणारे आहे.
या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होईल. आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा आणि व्यवसायाचा दर्जा घसरेल. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल, अशी भूमिका आयएमए ने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर २०२५ रोजी चे परिपत्रक तात्काळ रद्द करावे. आणि उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत कोणीतीही कारवाई करु नये. आधुनिक वैद्यकशास्त्राचे पावित्र्य राखत रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशा मागण्या आयएमए कडून करण्यात आल्या आहेत. तर यासंदर्भात गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व डाॅक्टर एक दिवसाचा टोकन संप करणार आहेत. ज्या मध्ये आपत्कालीन सेवा ही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली आहे. तसेच शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानात भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषण ही छेडण्याचा इशारा ही आयएमए ने दिला आहे.