अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील तहसील कार्यालयातील गलथान कारभार आणि गेल्या १४ वर्षांपासून बंद असलेल्या लिफ्टमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात दिव्यांगांसह नागरिक आणि प्रहार जनशक्ती पक्षाने ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर तहसीलदारांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
तहसील कार्यालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे दिव्यांग व्यक्ती, वृद्ध नागरिक आणि गर्भवती महिलांना मोठी गैरसोय होत आहे. एका दिव्यांग कर्मचाऱ्यालाही रोज तीन मजले पायी चढावे लागते, ज्यामुळे प्रशासनाचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे. याशिवाय, उत्पन्नाच्या दाखल्यांसारखी अनेक महत्त्वाची कामे सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. तहसीलदारांची अनुपस्थिती आणि कामकाजातील दिरंगाई यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, एका आदिवासी बांधवाशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र रोष आहे.
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील आणि अंबरनाथ शहर अध्यक्ष आलम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी मोहन बिल्डरवर कारवाई करणे, कार्यालय दलालमुक्त करणे, प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि भ्रष्टाचार थांबवणे यांसारख्या मागण्या केल्या. अखेरीस, तहसीलदार अमित पुरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन माफी मागितली आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे, दिव्यांगांसाठी तळमजल्यावर विशेष खिडकी सुरू करण्याचे आणि येत्या दोन-तीन महिन्यांत लिफ्टचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.