डहाणू विवळवेढेच्या श्री महालक्ष्मी देवीचा पितृ बारस उत्सव

    17-Sep-2025
Total Views |

कासा :
महाराष्ट्रासह गुजरात मधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या डहाणू विवळवेढेच्या महालक्ष्मी देवीचा पितृ बारस(बारशी)आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बारस निमित्त महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट आणि देवीची सुंदर मनमोहक शृंगार करण्यात येणार आहे.

शारदीय नवरात्रौत्सव सुरू होण्याच्या अगोदर महालक्ष्मी आईचा अभिषेक करून नवरात्रोत्सवाच्या तीन दिवस आधी पितृ बारस (बारशी) साजरी करण्यात येते. पितृपक्षात व्दादशीच्या दिवशी पितृ बारस साजरी केली जाते. अलीकडे बारस ह्या शब्दाचा "बारसं" असा अपभ्रंश झाल्यामुळे देवीचा वाढदिवस असल्याचे मानून वाढदिवस साजरा केला जातो.

महालक्ष्मी देवी पालघर जिल्ह्यातील शेकडो नागरिकांची कुलदैवत असुन,येथील नागरिक बारस साजरी होण्याअगोदर अनेक प्रकारच्या फळ-भाज्या आणि कडधान्य खाणे वर्जित करत असतात. या फळ-भाज्या बारशीच्या दिवशी देवीला नैवेद्य अर्पण करून मगच त्यांचे सेवन केले जात असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात येते. यामध्ये नवीन धान्य, काकडी, भोपळा यासह अजून इतर भाज्यांचा समावेश आहे.

पितृ बारशीच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त मंदिराच्या आवारात आणि बाहेर रात्रभर पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचगाणे करून आपला आनंद व्यक्त करतात व बारशी पासून पुढे तारपा नृत्याला सुरुवात केली जाते. बारशी निमित्त महालक्ष्मी मंदिरात लाखो भक्त आईच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. यंदा मोठ्या उत्साहात बारस साजरी करण्यात येणार आहे, बारशी निमित्त एकदिवसीय यात्रा भरली असून, अनेक छोटी-मोठी दुकाने थाटली आली आहेत. यामध्ये घरघुती वापराच्या वस्तू, भातकापणी जवळ आल्यामुळे शेती साठी लागणारी अवजारे, महिलांची सौंदर्य प्रसाधने, कपडे व स्थानिक दुकानदार अशी दुकाने थाटली आहेत.

बारशी निमित्त श्री महालक्ष्मी माता ट्रस्ट विवळवेढे तर्फे मंदिराची रोषणाई करण्यात आली असुन,सुरक्षेच्या दृष्टीने खाजगी सुरक्षा व्यवस्था, तसेच कासा पोलीस स्टेशनला सुरक्षे विषयी पत्र देण्यात आले आहे. अध्यक्ष(श्री महालक्ष्मी माता ट्रस्ट विवळवेढे) संतोष देशमुख. बारशी उत्सवाच्या निमित्ताने कासा पोलीस स्टेशन तर्फे सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असुन, सुरक्षेच्या दृष्टीने कासा पोलीस स्टेशन सज्ज आहे, कासा पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे.