'एसएनडीटी' विद्यापीठात 'प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियाना'ची अंमलबजावणी!
20-Feb-2024
Total Views | 124
मुंबई : मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठ (MERU) कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी जम्मू येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत मेरू साठी १०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक निपुण विनायक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव यावेळी बोलताना म्हणाल्या की, "आपल्याला स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची गरज आहे. तसेच अशा प्रकारच्या समर्थनामुळे 'मेकर स्पेस' तयार करणे शक्य होईल जेथे मुली इलेक्ट्रॉनिक, सिम्पेंटी आणि इतर सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची स्वप्ने साकार करू शकतील," असे त्या म्हणाल्या. याशिवाय त्यांनी या योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील याचे आभार मानले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी महाराष्ट्रातील ११ विद्यापीठे 'प्रधानमंत्री-उषा चा भाग असल्याची माहिती दिली. या प्रस्तावाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच एसएनडीटीचा विस्तार वाढत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी संलग्नित महाविद्यालय हाताळण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित केले आणि विस्तारासह गुणवत्ता कमी होऊ न देण्याचे आवाहनही केले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रुबी ओझा यांनी 'मेरू@विकसित भारत २०४७' सादर करून विद्यापीठाच्या संशोधन आणि शैक्षणिक कामगिरीची माहिती दिली. १०७ वर्षांचे हे विद्यापीठ चंद्रपूर आणि पालघर येथे दोन नवीन कॅम्पस आणि विद्यमान ३०७ संलग्न महाविद्यालयांमध्ये ८२ नवीन महाविद्यालयांसह विस्तारत आहे. मेरू आयसीटी आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास, सुधारित संशोधन वातावरण आणि भागधारकांची क्षमता वाढवणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. प्रतिमा ताटके यांनी केले.