हिंदु धर्म विज्ञाननिष्ठ - परमपूज्य श्री सवितानंद महाराज
“शुद्ध बीजापोटी” या स्वामीजींच्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न
30-Dec-2024
Total Views | 41
ठाणे : हिंदू धर्म ( Hinduism ) हा कसा विज्ञाननिष्ठ आहे, याबाबत उद्बोधक प्रवचन देत स्वामी श्री सवितानंद महाराज यांनी हिंदु धर्मातील विविध महानता विषद केल्या. जनशक्ती बहुउद्देशीय संस्था, ठाणे आयोजित “ आपण हिंदू आहात का?” या विषयावर परमपूज्य स्वामी श्री सवितानंद महाराज यांचे अत्यंत उदबोधक तसेच विचारांना चालना देणारे प्रवचन शनिवारी (दि.२८ डिसे) ठाणे महापालिकेच्या नरेन्द्र बल्लाळ सभागृहात पार पडले.
यावेळी स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे परमपूज्य आनंदस्वामी, डोंबिवली गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा भागवताचार्य सौ अलकाताई मुतालिक, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (दिल्ली) अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, सीए संजीव ब्रह्मे व अविनाश काळे या पांच मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींच्या “शुद्ध बीजापोटी” या ग्रंथाचे प्रकाशन झाले. प्रकाशनानंतर स्वामीजींनी पाच तरूण दांपत्यांना या ग्रंथाच्या प्रती भेट दिल्या. त्यानंतर व्याख्यानामध्ये स्वामीजींनी आपण हिंदू आहोत का, हे कसे ओळखावे, तसेच, हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे हे समजावून सांगितले. ऋषी मुनींनी समाधी अवस्थेत आपल्या मेंदूचा अधिक वापर करून जे ज्ञान संपादन केले आहे, ते आजही आपल्याला साध्य झालेले नाही. ग्रहस्थितीचा मानवी जीवावर होणारा परिणाम विषद करून त्यांनी गर्भसंस्काराचे महत्व आणि गरज यावर सुद्धा विवेचन केले.
हिंदू धर्मातील पुनर्जन्म सिद्धांताचे महत्त्व उलगडत कर्मविपाक तत्वज्ञानाची माहिती दिली. त्याग, तपस्या, शील व चारित्र्य या चतुःसूत्रीचा आपल्याला पडलेला विसर आजच्या आपल्या समाजाच्या स्थितीला कारणीभूत आहे या स्वामी रामतीर्थांच्या बोधवचनाची आठवण करून देत त्यांनी चार पुरूषार्थ व चार वृद्धत्व यांवर विवेचन केले. प्रत्येकास ब्रह्मयज्ञ, देवतागण, पितृऋण, मनुष्ययज्ञ व भूयज्ञ या सर्वांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार अनिल शिंदे यांची मुळ संकल्पना असलेल्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मान्यवरांचा परिचय व आभार प्रदर्शन मनोज मसूरकर यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.