
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची गुंतवणूक आणि धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी धवसे यांची ही नेमणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धवसे यांनी २०१४ पासून सहसचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
दादर येथे जन्मलेल्या धवसे यांनी डी.जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी, एस.पी. जैन संस्थेतून पीजीडीएम आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून पब्लिक पॉलिसीची पदवी प्राप्त केली आहे. कौस्तुभ धवसे यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाला आकार देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राला भारतातील अग्रगण्य 'एफडीआय' केंद्र बनवणे, फिनटेक, डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर्स, लॉजिस्टिक्स आणि एआय क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणुकीला चालना देणे, मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचे नेतृत्व करून १.८ लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्याचे काम त्यांनी केले.