मुंबई : (Dr. Manmohan Singh) भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. नवी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून सतत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळत होते. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल कळताच देशभरातून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली जात आहे. काँग्रेस नेते राजीव शुक्ला पंतप्रधान निवासस्थानी असताना मनमोहन सिंग यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती.
ती इच्छा अपूर्णच...
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला होता. फाळणीनंतर ते आपल्या कुटुंबियांसोबत भारतात स्थलांतरित झाले. मात्र, लहानपणीच्या आठवणी कायमच त्यांच्यासोबत होत्या मनमोहन सिंग हे ज्यावेळी विदेशात काम करत होते, त्यावेळी ते एका पाकिस्तानी मित्रासोबत रावळपिंडीला गेले होते. लहानपणी ते ज्या गुरुद्वारात जायचे तिथेही ते गेले होते. मात्र, आपल्या मूळगावी जाण्याची संधी त्यांना मिळाली नाही.
एका मुलाखतीमध्ये राजीव शुक्ला यांनी म्हटले होते की, मनमोहन सिंग यांना एकदा तरी पाकिस्तानमध्ये ज्या गावात ते मोठे झाले त्या गावात जायचे होते. जिथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा त्यांना बघायची होती. कारण त्या शाळेशी आणि त्या गावाशी त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या होत्या. राजीव शुक्ला यांनी मनमोहन सिंग यांना विचारले होते की, तुम्हाला तुमचे घर पाहण्याची इच्छा आहे का? त्यावर मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले होते की, नाही माझे ते घर फार पूर्वीच उद्ध्वस्त झाले. मात्र, मनमोहन सिंह यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.