आमदार चित्रा वाघ : देवाभाऊंची प्रत्येक बहिण आणि तिच्या लेकी सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्नशील
26-Dec-2024
Total Views | 91
मुंबई : कल्याणमधील घटनेतील आरोपी विशाल गवळी याला फाशीच होणार असून आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिली. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी त्यांनी अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "माणुसकीला काळीमा फासणारी आणि संतापजनक ही घटना आहे. या घटनेतील आरोपीला फाशीच होणार आहे. मी स्वत: याबाबतचा पाठपुरावा करणार आहे. शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंग केल्याशिवाय गप्प बसलो नसतो. मात्र, संविधानिक पद्धतीने विशाल गवळीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. इथे देवाभाऊंची प्रत्येक बहिण आणि तिच्या लेकी सुरक्षित राहाव्या यासाठी आपले देवाभाऊ दिवस रात्र झटत आहे. तेसुद्धा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी संबंधित पोलिसांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे गवळीसारख्या नराधमांच्या नुसत्या मुसक्याच आवळल्या नाही जाणार तर त्यांना फासावर लटकवले जाणार हे नक्की आहे."
"समाजात फिरणाऱ्या अशा विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आम्ही सगळे त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सोबत आहोत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आमचा सर्वांचा समस्त महाराष्ट्रातल्या बहिणींचा विश्वास आहे की, विशाल गवळी सारख्या विकृतांना गाडल्याशिवाय आमचा देवा भाऊ शांत बसणार नाही," असेही त्या म्हणाल्या."