स्वीगी आणि एनएसई यांचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम देशात आदर्श ठरेल
सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त
24-Dec-2024
Total Views | 35
मुंबई : स्वीगी आणि एनएसईयांचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम नक्कीच पुढील काळात आदर्श ठरेल अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी या दोन्ही कंपन्यांकडून उचलेल्या गेलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे कौतुक केले. भारतातील ई - कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी स्वीगी आणि राष्ट्रीय रोखे बाजार यांच्यात खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या महिलांना गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाचे प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार झाला. मुंबई बीकेसी येथील एनएसईच्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. अमृता फडणवीस या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तसेच या कार्यक्रमास एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान आणि स्वीगीचे संस्थापक आणि व्यस्थापकीय संचालक श्रीहर्ष मजेटी उपस्थित होते.
येत्या पंधरा वर्षात भारत हा जगातील आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे त्यात भारतातील महिलांचे योगदान महत्वाचे असणार आहे. हाच योगदान लक्षात घेऊन स्वीगी या कंपनीने आपल्या खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या महिलांना आर्थिक गुंतवणुकीचे प्रशिक्षण मिळावे याकरीता राष्ट्रीय रोखे बाजारासोबत सामंजस्य करार केला आहे. "भारतातील स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवायचे असेल तर त्यांना त्यांच्या वेळेनुसार काम करायला मिळणे अपेक्षित आहे. त्यांच्या जर तसे काम करण्याची संधी मिळाली तर महिला खरोखरच सर्वच क्षेत्रात भरारी घेऊ शकतील" अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्व अधोरेखित केले. याच कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्या हस्ते स्वीगी कंपनीतील ज्या खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या महिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वीगीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला सावरले अशा महिलांचा सत्कार करण्यात आला.
"आर्थिक नियोजन हाच आर्थिक सक्षमीकरणाचा पाया" - आशिष चौहान
"भारतीय स्त्रियांना नुसतेच रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे एवढ्यानेच काम होणार नाही तर त्यातून मिळणाऱ्या पैश्यांचे नियोजन कसे करावे याचेही प्रशिक्षण त्यांना मिळणे गरजेचे आहे कारण तसे केले तरच त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील" अशा शब्दांत आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक प्रशिक्षणाचे महत्व एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान यांनी सांगितले.
खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या महिलांची संख्या १ लाखावर नेणार - श्रीहर्ष मजेटी
"२०३० सालपर्यंत स्वीगी कंपनी आपल्या खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या महिलांची संख्या १ लाखावर नेणार" असल्याचे स्वीगीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीहर्ष मजेटी यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या घराला सावरणाऱ्या या महिला आमच्यासाठी आदर्शच आहेत असे मजेटी यांनी सांगितले.