पक्ष संघटना, मतदारसंघातील जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी : योगेश टिळेकर
मामांच्या अंत्यसंस्कारावेळी आमदार टिळेकरांची प्रतिक्रिया
10-Dec-2024
Total Views | 130
पुणे : (Yogesh Tilekar) पुण्यामधील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे फुरसुंगी फाट्यावरून सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना पुढे तपासादरम्यान घटनास्थळापासून ४०-४५ किमी अंतरावर शिंदवणे घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. मामांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या योगेश टिळेकरांनी पक्ष आणि मतदारसंघ त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले.
मृतदेह सापडल्यानंतर मिळालेल्या नवीन माहितीनुसार, सतीश वाघ यांची हत्या लाकडी दांडक्याने मारून करण्यात आली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचे चार अज्ञातांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर यवत पोलीस स्थानकाच्या हद्दीतील शिंदवणे घाटामध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. त्यांच्या मृतदेहाशेजारी लाकडी दांडका पोलिसांना आढळून आला आहे. मात्र हत्येमागील कारण अद्यापही कळलेले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
आमचा पक्ष आणि मतदारसंघ आमच्या परिवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे : योगेश टिळेकर
मामांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या योगेश टिळेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्या मामांचं याच ठिकाणाहून अपहरण झालं, पोलिसांना तपासामध्ये मृतदेह सापडला. अपहरण करून खून केल्याची घटना आमच्या परिवारासोबत झालेली आहे. पोलीस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करत आहे. लवकरच या हत्येमागचं कारण काय आहे? याचा पोलीस सुगावा लावतील. आमच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. माझी आई, आम्ही सगळेजण मोठ्या धक्क्यामध्ये आहोत. पोलीस सहकार्य करत आहेत, सगळी यंत्रणा काम करत आहे. आशा आहे की लवकरच गुन्हेगारांवर कडक कारवाई होईल आणि त्यांना शासन होईल, असे योगेश टिळेकर यांनी म्हटले आहे.
"आमदाराचा मामा असो किंवा सर्वसामान्य नागरिक असेल, कोणत्याही कुटुंबावर असा आघात होतो त्यावेळी यामध्ये राजकारण न करता पोलिसांची बाजू समजून घेतली पाहिजे. आमचा परिवार त्यांना तपासामध्ये मदत करत आहे. शेवटी यंत्रणा आहे, सरकार चांगलं काम करत आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सामान्य नागरिकांवर अन्याय झाला तर त्याला आधार देणारे नेतृत्त्व आहेत. त्यामुळे आमदाराचा मामा असेल किंवा सर्वसामान्यातील घटक गेला तरी सरकार तेवढंच सक्षमपणे काम करणार. सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली आहे. आमचा पक्ष आणि मतदारसंघ आमच्या परिवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे", असेही योगेश टिळेकर म्हणाले.
नेमकं काय घडलं?
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ, (वय ५५ ) नेहमीप्रमाणे सकाळी मांजरी येथील राहत्या घरातून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जाताच चार अज्ञातांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनामध्ये डांबून त्यांचे अपहरण केले. हा संपूर्ण प्रकार जवळच थांबलेल्या एका व्यक्तीच्या निदर्शनास आला आणि त्याने वाघ कुटुंबियांना याबद्दल कळवले. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.