राज ठाकरेंनी राऊतांना झाप झाप झापलं!, "महाराष्ट्राची भाषा घाण करणारा भिकार संपादक" म्हणत टीका!
09-Nov-2024
Total Views | 113
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भांडूपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी आपल्या नियमित पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलणार, असा जोरदार पलटवार केला आहे.
कुणी दादागिरीची भाषा केल्यास दुप्पट दादागिरी करेन - राज ठाकरे
या संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिकार संपादक इकडे राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना 'तुम दो मारो हम चार मारेंगे. घाण करुन टाकलं सगळं राजकारण! सकाळी उठायचं, यांना (प्रसारमाध्यमांना) धरायचं. कसलाही मागचा पुढचा विचार नाही, सकाळी उठायचं वाट्टेल ते बडबडत बसायचं. संयम बाळगतोय याचा अर्थ xxxx समजू नये, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावर केला. तर मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संजय राऊतांचे प्रत्युत्तर
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की, "राज ठाकरे बोलतायत, बोलू द्या. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलय. भाषेची शुद्धता स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची ? महाराष्ट्राच्या शत्रूसाठी ? आम्ही ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाहीत. राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. भाजपच स्क्रिप्ट आहे. फडणवीसांच स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची तलवार आहेच” असं संजय राऊत म्हणाले.
“आम्ही अत्यंत सभ्य, सुस्कृंत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलंय. माझं बरचंस आयुष्य बाळासाहेबांबरोबर गेलंय हे राज ठाकरेंना माहित आहे. कोणती भाषा कधी वापरायची, काय लिहायचं, काय बोलायचं, याचे मला धडे घेण्याची गरज नाही, ते राज ठाकरे असतील तर मी राऊत आहे. बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे” असं संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.