ठाणे : ( MNS ) विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी प्रचारासाठी दंड थोपटले असुन नेतेमंडळीनीही आता कंबर कसली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभेसाठी पहिली जाहिर प्रचार सभा सोमवारी (ता. ०४ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वा. ठाण्यातील ब्रम्हांड सर्कल येथे होत आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली असून मनसे नेते अभिजीत पानसे, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिक सज्ज झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनसेची बुलंद तोफ धडाडणार आहे. कोपरी-पाचपाखाडी वगळता उर्वरीत तीन विधानसभा मतदार संघात उभे ठाकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी युती आणि आघाडीसह दिग्गजांसमोर आव्हान उभे केले आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे उभे आहेत. ओवळा - माजिवडा मतदार संघातून संदीप पाचंगे आणि कळवा-मुंब्रा मतदार संघात ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव हे उमेदवार रेल्वे इंजिन ही निशाणी घेऊन उभे आहेत. सोमवारी राज ठाकरे, अविनाश जाधव यांच्यासह या अन्य दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे येत असल्याने महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवुन राज ठाकरे यांनीही प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ठाण्याचीच निवड केल्याने अवघ्या राज्याचे लक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लागले आहे. दरम्यान आजच्या जाहीर सभेत राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार? विधानसभा निवडणुकीत मनसेची रणनीती काय? राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरेंचे फटकारे कुणावर ?
ठाण्यातील ब्रम्हांड सर्कल येथे सोमवारी ०४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहिर सभेकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. सभेत राज ठाकरे हे "लाव रे तो व्हिडिओ" च्या माध्यमातुन प्रतिस्पर्धी उमेदवारांचे वाभाडे काढतात की, फटकारे देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.