संजय केळकर यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने दिला जाहीर पाठिंबा...
03-Nov-2024
Total Views | 28
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं या महायुतीचे उमेदवार संजय केळकर (Sanjay Kelkar ) यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह नुकतीच केळकर यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आ. संजय केळकर यांच्यावर विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार संजय केळकर यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविणारे पत्र सुपुर्द केले आहे.
केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने दिली, त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो असे सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोरगरीब जनतेसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनतेला न्याय देणारा खरा आमदार हे केळकर आहेत असेही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचे समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे असे आवाहन त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचे वचनही त्यांनी दिले.