डोंबिवलीचा विकास हीच माझी जबाबदारी : रविंद्र चव्हाण
18-Nov-2024
Total Views | 28
1
डोंबिवली : “डोंबिवलीकरांनी मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. मला निवडून देणार्या जनतेच्या उपकारांचे ओझे माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे डोंबिवलीचा विकास करणे हीच माझी जबाबदारी आहे,” अशी भूमिका रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी व्यक्त केली.
निमित्त होते डोंबिवली पश्चिम येथील रामचंद्र कॉम्प्लेक्स येथे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या महायुतीच्या जाहीर सभेचे. मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, “२००९ साली कल्याण मतदारसंघाचे चार भाग झाले. त्यातील डोंबिवली विधानसभा निवडणुकीत मला पहिल्यांदा आमदार होण्याची संधी येथील जनतेने दिली. आज गेली पंधरा वर्षे मी या डोंबिवलीचा आमदार आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक इंचही फरक नाही. येथील सर्वसामान्य माणसाच्या मनात जी खंत आहे, ती माझ्याही मनात आहे. डोंबिवली शहराचे हित कशात आहे, हे मी ओळखले आणि डोंबिवलीची ओळख सातासमुद्रापार पोहोचली पाहिजे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतो,” असे मंत्री रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले. दरम्यान, चव्हाण यांच्या आगमनापूर्वी शिवसेना महिला पदाधिकारी रश्मी गव्हाणे आणि शैलेश धारगुडे यांची जोरदार भाषणे झाली. डोंबिवली पश्चिम येथील रश्मीका चित्रेने सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, याबद्दल रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. हजारोंच्या संख्येने डोंबिवली पश्चिम येथील नागरिक या प्रचार सभेसाठी उपस्थित होते.
व्यासपीठावर शिवसेनेचे जनार्दन म्हात्रे, संजय पावशे, महेश पाटील, सुजित नलावडे, राहुल म्हात्रे, प्रताप पाटील, भाजपचे राजेश म्हात्रे, विद्या म्हात्रे, राष्ट्रवादीचे सुरेश जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विश्वास भोईर यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.
बाळा म्हात्रे यांच्या नेतृत्वात भव्य रॅली
शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिम अनमोल नगरी येथून उमेदवार रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. अनमोल नगरी येथून सुरू झालेल्या रॅलीने गरिबांचा वाडा, विजय सोसायटी, उमेश नगर, महाराष्ट्र नगर आणि गावदेवी मंदिर परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हजोरो महिला-पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते. अनमोल म्हात्रे, संदीप सामंत, कविता म्हात्रे, प्रताप पाटील, विजय भोईर, अनिल भोईर, राहुल म्हात्रे, मनोज वैद्य, मनोज भोईर आदी पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.