"ॲक्सिडेंटल पीएम सिनेमा आला तसंच कसब्यात ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला", नाव न घेता देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसच्या आमदारावर टीका
16-Nov-2024
Total Views | 20
पुणे : (Devendra Fadnavis) "देशामध्ये ॲक्सिडेंटल पीएम सिनेमा आला तसंच कसब्यात ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला ज्याची कामं कमी आणि दंगे जास्त", असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली.
"खरंतर आपल्याला माहितेय की या देशामध्ये एक सिनेमा आला होता ॲक्सिडेंटल पीएम, तसं मागील निवडणुकीमध्ये या कसबा मतदारसंघामध्ये एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला. आणि या ॲक्सिडेंटल आमदाराचे काम कमी आणि दंगा जास्त, काम कमी आणि नाटकं जास्त आहेत. मला तर असं वाटतं या आमदाराला रंगभूमीवर नेलं असतं तर ‘तो मी नव्हेच’ हे पात्र इतकं सुंदर या आमदाराने केलं असतं पण ठीक आहे. आपल्याला काही त्याच्यावर बोलायचं कारण नाहीये. त्यांच्या कामांबाबात मी सांगायला नको" अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली.
पुढे फडणवीस म्हणाले, "हेमंत रासने यांनी महापालिकेत काम केल्याने विकास कसा करायचा, याची जाण त्यांना आहे. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर नैराश्याने घरी न बसता रासने यांनी दुसऱ्या दिवसापासून जनतेत जाऊन काम सुरू केले."
कसबा मतदार संघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, हेमंत रासने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर, जगदीश मुळीक, संजय सोनवणे, स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट, संदीप खर्डेकर, अजय खेडेकर, मनीषा लडकत, उदय लेले यावेळी उपस्थित होते.