नवी दिल्ली : (Delhi Air Quality Index ) दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हवेच्या गुणवत्तेचा सरासरी निर्देशांक (एक्यूआय) ४३० इतका नोंदवला गेला. ही पातळी आरोग्यासाठी हानिकारक आहे. दिल्लीतील अनेक भागात एक्यूआय ४०० च्या पुढे आहे. फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा आणि नोएडा येथेही वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत राहिले.
गुरुवारी राजधानी दिल्लीतील बहुतांश भागात एक्यूआय पातळी ४०० च्या वर गेली आहे, ज्यात अलीपूरमध्ये ४२०, आनंद विहारमध्ये ४७३, अशोक विहारमध्ये ४७४, आया नगरमध्ये ४२२, बवानामध्ये ४५५, चांदनी चौकात ४०७, द्वारका सेक्टर ८ मध्ये ४५८, जहांगीरपुरी येथे ४३४, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ४४४ आणि मंदिर मार्गावर ४४० नोंद झाली आहे.
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून राजकारणही तापले आहे. भाजप दिल्लीतील आम आदमी पक्ष सरकारला कोंडीत पकडत आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी आप सरकारचा समाचार घेत शाळांमधील पाचवीपर्यंतचे वर्ग बंद करण्याची मागणी केली आहे. सचदेवा यांनी दिल्ली गॅस चेंबर बनली असून त्यासाठी सत्ताधारी आप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.