कलिनाचं परिवर्तन हेच ध्येय : अमरजीत सिंह

    13-Nov-2024
Total Views | 49
Amarjit Singh

मुंबई : “निवडणुका तोंडावर आल्या की मते मागायला येण्यापेक्षा, आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादित करण्यासाठी आम्ही काम करत असतो. येत्या काळात कलिनामध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे, कलिना विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अमरजीत सिंह ( Amarjit singh )यांनी. दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत त्यांनी साधलेला हा विशेष संवाद.

कलिनामधील सत्ताधारी पक्षाच्या मते मागच्या दहा वर्षांत त्यांनी विकास केला आहे, यावर आपली प्रतिक्रिया काय?

‘विकास केला’ अशी केवळ आवई उठवण्यात आली आहे. वास्तविक येथील लोकप्रतिनिधींनी मागच्या दहा वर्षांत आपल्या मतदारसंघामध्ये यायचेदेखील कष्ट घेतलेले नाहीत. सामान्य माणसांना वेळ न देणे, लोकांपासून दूर राहणे यामुळे नागरिकांच्या मनात सत्ताधारी आमदारांच्या विरोधात प्रचंड रोष आहे. लोककल्याणाचे प्रकल्प आणायाची संधी असतानादेखील इथल्या राजकारणी लोकांनी ती संधी वाया घालवली. येथील जनतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

कलिनामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्नसुद्धा काही काळ प्रलंबित होता, त्याबद्दल आपले मत काय?


झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प राबवायची संधी असतानादेखील येथील राजकारण्यांनी त्यावर भर दिला नाही. विमानतळाच्या परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. आजपर्यंत त्यांच्या समस्या येथील आमदारांनी कधीच मांडल्या नाहीत. या सामान्य माणसांपर्यंत आमदार पोहोचले नाहीत. आज तेथील लोकांना राहायला पक्की घरे नाहीत. एका कुटुंबातील दोन पिढ्यांना राहायला स्वतःचे घर नसावे, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. आम्ही सत्तेत आल्यावर हे चित्र बदलेल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो.
 
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यंदा सहा प्रमुख पक्ष रिंगणात उतरले आहेत, याकडे आपण कसे बघता?

महायुती सरकारने आपल्या कारकिर्दीत विकासाचा संकल्प केला आणि तो पूर्णसुद्धा करून दाखवला. त्यामुळे इथली जनता आमच्या पाठीशी उभी राहील, यात शंकाच नाही. जनतेचा पाठिंबा हा नेहमी विकासाला राहिलेला आहे. त्यामुळे समोर आव्हाने कितीही असली, तरी जनतेच्या मनातले, विकासाचा संकल्प असलेलेच सरकार येणार, यात शंकाच नाही.

 विधानसभेचे उमेदवार म्हणून कलिना मतदारसंघासाठी आपले व्हिजन काय?

आताच्या घडीला कलिनाला आम्हाला अमली पदार्थांच्या जोखडातून मुक्त करायचे आहे. त्यासोबतच, ‘स्वच्छ कलिना, हरित कलिना’ यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. याबरोबर काही ठिकाणी निर्माण झालेली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्ही इथल्या लोकांसाठी अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेले रुग्णालय उभारणार आहोत. कलिना म्हणजे विद्यानगरी. येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकायला येतात. त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा उपल्बध करून देण्याचे काम निवडून आल्यानंतर करणार आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही इमारतदेखील बांधणार आहोत.

उमेदवार म्हणून आपल्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत?


निश्चितच, आमच्या लोकांकडून अपेक्षा आहेत. लोकांना त्यांची कामे करणारा, त्यांच्या सेवेसाठी वर्षाचे 365 दिवस उपलब्ध असणारा नेता हवा असेल, तर त्यांनी महायुती सरकारची निवड करायला हवी. जनसेवेचा वारसा असलेली, समाजकार्याचा ठसा उमटवणारी महायुती लोकांसोबत असेल. त्याचबरोबर, लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल, यात शंकाच नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121