जागतिक ‘ड्रोन हब’ बनण्याकडे भारताची वाटचाल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
12-Nov-2024
Total Views | 28
नवी दिल्ली : तंत्रज्ञानामुळे मूलभूतपणे युद्धाच्या पद्धती आणि साधने बदलत आहेत. त्यानुसार भारतही सज्ज असून असून जगाचे ‘ड्रोन हब’ ( Drone hub ) बनण्याक़डे भारताची वाटचाल आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले आहे.
मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेने (एमपी-आयडीएसए)‘अनुकुलनात्मक संरक्षण:आधुनिक युद्धस्थितीच्या बदलत्या परिदृश्यातून प्रवास’ या विषयावरील ‘दिल्ली डिफेन्स डायलॉग’चे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. यावेळी ते म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञानाने मूलभूतपणे युद्धाच्या पद्धती आणि साधने बदलत आहेत. जगातील ‘ड्रोन हब’ बनण्याचे भारताचे ध्येय आहे. या संदर्भात अनेक पुढाकार घेण्यात आले आहेत. यामुळे केवळ भारतीय अर्थव्यवस्थेलाच मदत होणार नाही तर 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' कार्यक्रमालाही बळ मिळणार आहे. केंद्र सरकारने आयडेक्स आणि एडीआयटीआय या क्षेत्रातील संशोधन आणि विकास सुधारण्यासाठी धोरण आखले आहे, असेही ते म्हणाले.
‘ॲडाप्टिव्ह डिफेन्स’ हा केवळ धोरणात्मक निवडीचा पर्याय नाही, तर एक गरज आहे असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जसजसे आपल्या देशासमोर अनेक प्रकारचे धोके नव्याने उभे राहत आहेत त्याच पद्धतीने आपल्या संरक्षण यंत्रणा आणि धोरणे देखील विकसित झाली पाहिजेत. भविष्यात सामोऱ्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. केवळ देशाच्या सीमांचेच संरक्षण इतकाच हा विषय मर्यादित नाही तर आपले भविष्य सुरक्षित करण्याचा मुद्दा आहे. सध्याच्या डिजिटलीकरण आणि माहितीच्या अति प्रमाणात होत असलेल्या माऱ्याच्या युगात, संपूर्ण जग अभूतपूर्व प्रमाणात मानसिक लढ्याला तोंड देत आहे यावर संरक्षणमंत्र्यांनी अधिक भर दिला.