आनंदनाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ या सुदिनी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज झाले. या घटनेस या वर्षी ३५० वर्षे झाली. या अलौकिक घटनेची आठवण म्हणून ‘सागरी सीमा मंच’ आणि ‘शिवशंभू विचार मंच’ यांनी सागर परिक्रमा दि. २७ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ दरम्यान कुलाबा (मुंबई) ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) सागर परिक्रमा केली. त्या परिक्रमेचा वृत्तांत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक शकाचे औचित्य साधून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ‘सागरी सीमा मंच’ आणि ‘शिवशंभू विचार मंच’ या दोन संस्थांनी मिळून अनोखी अशी शिडाच्या नौकेतून सागरी परिक्रमा करण्याची धाडसी मोहीम आखली. अनिकेत कोंडाजी व भानुदास जाझम यांची स्वतःची शीड-नौका असल्याने त्यांनी ही संकल्पना सर्वांसमोर ठेवली आणि बघता बघता सर्व कार्यकर्त्यांनी ती संकल्पना उचलून धरली. परिक्रमेची व्यवस्था नियोजन करायचे होते. यामध्ये स्व हमी पत्र, ट्रॅव्हल वीमा, मेडिकल, जीपीएस, वॉकी टॉकी, लाईफ जॅकेट, एसआय पद्धती आदीची तयारी केली होती. याचबरोबर संपूर्ण परिक्रमेत त्याबद्दलचे उद्देश आणि धोरणे यासाठी सागरी प्रवास शीडनौकेतून आणि ट्रॉलर बोटने करावा लागणार होता म्हणून सर्वांना ओळख पत्र, कॅप, टी-शर्ट आदीची व्यवस्था केली होती. शासकीय परवानगीसाठी विविध परवानगी, सूचना, माहितीपत्रके संबंधित विविध विभागाला दिली होती.
सागरी प्रवास सहा/आठ दिवसांचा होता. प्रवासातील सततचे हेलकावे दुपारचे ऊन आणि रात्रीची थंडी यामुळे होणारा त्रास सहन करत हा प्रवास करणे तितके सहज नव्हते. डोकेदुखी, पोटात मळमळणे, उलट्या होणे, आम्लता यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. कारण, समुद्र प्रवास करण्याचा अनुभव नसणे. परंतु या सर्वांचा विचार करूनच मोहिमेत लोक सहभागी झाले होते. दि. २७ डिसेंबरला कुलाबा कफपरेड येथे मच्छीमार वसाहतीत परिक्रमेच्या प्रयाणाचा समारंभ झाला. अथांग सागरातील आमच्या एकमेकांना आम्हीच आमचे निदान पाच दिवस का होईना, पण एकमेकांचा आधार होतो. कोण खलाशी, कोण छायाचित्रकार, कोण खानपान व्यवस्थेतील तर कोण तांत्रिक आणि इतर व्यवस्थापनेत होते. मी आणि एकदोघे इतिहास अध्यसन आणि किनार्यावरील वक्ते तसेच मोहिमेदरम्यान असलेली ऐतिहासिकस्थळे त्यांच्याबद्दल ज्ञात स्थळविशेष याविषयी मार्गदर्शन, निरीक्षण आणि आभ्यास या गटात होतो. बाकी इतर सर्व कामे ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या तत्वाने करायची होते.
स्वच्छ सागर किनारे, किनार्यावरील स्वच्छ, वस्ती, पर्यावरण आणि त्याचबरोबर ऐतिहासिक वस्तू व वास्तु यांचे संवर्धन करावे. इतिहासातून प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्ती जागृती व्हावी, म्हणून प्रेरणादायी इतिहासाची शास्त्रशुद्ध मांडणी करणे. पर्यटनातून व्यवसाय आणि रोजगार निर्मिती कशी करता येईल आणि आपल्याच भागात सुस्थितीत कसे राहता येईल याची जनजागृती करावी, असे उदात्त हेतू मनात ठेवून ही सागरी परिक्रमा नियोजित करण्यात आली. या साहसी सागरी परिक्रमामध्ये कोकणातून ४५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमचे जहाज पहाटे ४ वाजताच निघणार होते. तशा तयारीत सर्व कुलाब्याच्या बंदरावर जमले. जहाज धक्क्याला लागले. कुलाबा ते गेट वे ऑफइंडिया प्रवासात अनेक जहाजे नांगरलेली पहिली काही प्रचंड मोठी होती. हळूहळू भारतद्वार मागे टाकत जहाज पाणी कापत पुढे सरकत होते. तसतसे मुंबईतील दिवे लुकलुकत लुप्त झाले. आजूबाजूला फक्त काळोख उरला. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि इंजिनाचा आवाज यांचा ताल आणि जहाजाचे हेलकावे असा ताल जेव्हा आमच्या मनाने पकडला तेव्हा आम्हाला समुद्राशी जुळते घेण्याचा पहिला धडा मिळाला.
ही परिक्रमा करताना मनातील आनंद वर्णन करणे कठीण आहे. २७ तारखेला कुलाबा, कफपरेड येथे सागर परिक्रमेचा उद्घाटन असा जाहीर कार्यक्रम झाल्यावर, २८ तारखेला पहाटे या विचारात असतानाच परिक्रमा मोहिमेतील पहिल शिवतीर्थ नजरेत आले. शिवनिर्मित समुद्रातील एक शौर्यशिल्प जलदुर्ग किल्ले खांदेरी. खांदेरी किल्ला पाहताना इतिहासाची उजळणी केली आणि किल्ला पाहून आम्ही कुलाबा किल्ल्याकडे प्रयाण केले. श्रीबाग येथे सायंकाळी इतिहास अभ्यासक सुधीर थोरात सरांचे व्याख्यान झाले आणि रात्रीचा मुक्काम झाला आणि सकाळी कुलाबा किल्ला पाहून आम्ही पुढील प्रवासास लागलो.जसे जमिनींवरील जाहीर कार्यक्रम नक्की झाले होते. तसे प्रवासात चालत्या बोटीवरील (होडी) कार्यक्रम नक्की झाले होते. सकाळी संघ शाखा, एकात्मता स्तोत्र व मंत्र, धृतयोग, प्राणायाम, योगासन, गीत, अमृवचन त्याचबरोबर चर्चा सत्र, बौद्धिक, पोवाडे, विविध विषयावर मांडणी, समूह चर्चा, कोळी आगरी गीते, सागरी शिलेदारांच्या कथा, राज्यभिषेख व आरमार माहिती वेळापत्रक प्रमाणे बोटीवरील कार्यक्रम दैनंदिन होत होते. स्थानिक जलदुर्ग आणि त्या परिसरातील माहिती, मोहिमा लढाया इ. व्याख्याताद्वारे माहिती दिली गेली. या सागरी मोहिमेत भारतीय तटरक्षक दलाचे सहयोग लाभले. कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून माहिती दिली. सागरी पोलीस, नेव्ही, सीमा शुल्क विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग आदींचे सहकार्य लाभले.
मुंबई, अलिबाग, बुरोंडी (दापोली), रत्नागिरी व विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) येथे जाहीर कार्यक्रम हे उत्तम प्रकारे यशस्वी झाले. स्थानिक संस्था मंडळे, मच्छीमार संस्था सोसायटी यांनी स्थानिक कार्यक्रमाचे नियोजन ‘सागरी सीमा मंच’बरोबर केले होते. यामध्ये निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुद्धा स्थानिकांनी केले होते. पारंपरिक वेषात स्वागत, ढोल-ताशा व फटाके फोडत स्वागत केले गेले. स्थानिक बोटी हे समुद्रात येऊन बोटी एकत्र येऊन स्वागत केले गेले. कार्यक्रममध्ये आरमारतील योद्धे त्यांच्या परिवारातील व्यक्तींचा सत्कार व त्यांची माहिती दिली, सुरक्षा रक्षक व जीवरक्षक यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. अनिकेत कोंडाजी यांनी प्रत्येक ठिकाणी सागरी परिक्रमाविषयी माहिती, आवश्यकता, उद्देश्य स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी आवाहनसुद्धा केले होते.
२९ तारखेला सुवर्णदुर्ग, फत्तेगड, गोवाकिल्ला आणि कनकदुर्ग यांच दर्शन घेतल आणि पुढील प्रवासास निघालो. संध्याकाळी दापोली येथील बुरुंडी गावी कार्यक्रम होता. कोळी, भंडारी बांधवांनी जंगी स्वागत केले. त्यांच्या प्रेमाने क्षणभर भरून आल. कोण कुठले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सारे जोडले गेलो होतो.तर तीथला पाहुणचार घेऊन रात्रीच प्रवास सुरू केला आणि ३० तारखेला आम्ही रत्नागिरी येथे भगवती किल्ल्याजवळ पोहोचलो. तिथले प्रबोधनाचे व्याख्यान पंकज भोसले यांचे झाले. दुसर्या दिवशी ३१ तारखेला जवळच कातळशिल्प संग्रहालय पाहिले. शेवटच्या टप्प्यातील स्थळ विजयदुर्ग येथे संध्याकाळी पोहोचलो. सूर्यास्त समयीचे विजयदुर्गाचे दर्शन आणि त्याचा इतिहास जागवत झोपी गेलो. १ तारखेला विजयदुर्ग स्थळदर्शन करून जवळच्या रामेश्वराकडे परिक्रमा पूर्ण केल्याची सेवा अर्पण केली. संध्याकाळी विजयदुर्ग येथे सांगता समारोप अनिकेत कोंडाजी यांनी केला. रणजित हिर्लेकरांचे व्याख्यान झाले. प्रमुख उपस्थिती आयपीएस कृषिकेश रवाले (सिंधुदुर्ग जिल्हा डझ) व सुमंत अमशेकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांत प्रचारक) उपस्थित होते. मर्दानी खेळाने विजयदुर्गाला परत एकदा शौर्याचे दर्शन झाले. अप्रतिम अशी ही अनोखी परिक्रमा इतिहासाचा जागर करत जनसंपर्क आणि जनजागृती करत पुढील कार्यासाठी ऊर्जा घेऊन आम्ही घरी परतलो.
-केतन अंभिरे